दिलीप दहेलकर ।लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांच्या बदल्या ३१ जुलैपूर्वी समुपदेशनाने करावयाचे आहेत. हे आदेश ६ जुलै २०२० ला प्राप्त झाले. मात्र आता १५ जुलै २०२० रोजी जि.प. शिक्षकांच्या बदली प्रक्रियेसंदर्भात ग्राम विकास विभागाचा नवीन आदेश निघाला. मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना हे आदेश प्राप्त झाले असून कर्मचाऱ्यांसोबतच शिक्षकांच्याही बदल्या ३१ जुलैपूर्वी करण्यासाठी प्रशासनाला तारेवरची कसरत करावी लागणार आहे.बदलीपात्र शिक्षकांसह कर्मचाऱ्यांच्या याद्या तालुकास्तरावर अद्यावत करण्याच्या कामास वेग आला आहे. येत्या १५ दिवसात जि.प.च्या ६०० पेक्षा अधिक शिक्षकांच्या बदल्या ऑफलाईन होणार आहेत.जिल्हा परिषद शिक्षकांच्या बदल्या यावर्षी ऑनलाईन करण्यात येत होत्या. मात्र कमी कालावधीत ही प्रक्रिया यंदा शक्य नाही. शासनाने ७ जुलै २०२० रोजी आदेश काढून सदर बदली प्रक्रिया ऑफलाईन करण्याचा निर्णय घेतला आहे. या बदली प्रक्रियेमुळे गडचिरोली जिल्ह्याच्या दुर्गम व नक्षलग्रस्त भागातील शिक्षक व कर्मचाऱ्यांना प्राधान्याने शहरी भागात व तालुक्यात बदली मिळण्याची आशा अनेकांना लागली आहे. सुगम व दुर्गम क्षेत्रात १० वर्षापेक्षा अधिक सेवा झालेल्या व विद्यमान शाळेत तीन वर्षाचा कालावधी पूर्ण झालेले शिक्षक या बदली प्रक्रियेस पात्र ठरणार नाही.गडचिरोली जिल्हा प्रशासन अंतर्गत बाराही तालुक्यात जवळपास १ हजार ५५० प्राथमिक शाळा आहेत. या शाळांमध्ये पाच हजाराच्या आसपास शिक्षक कार्यरत आहे. १५ टक्के बदलीच्या मर्यादेनुसार एकूण शिक्षक संख्येपैकी ६०० शिक्षकांच्या बदल्या आॅफलाईन होणार आहेत. यामध्ये मुख्याध्यापक, पदवीधर शिक्षक व प्राथमिक शिक्षक आदींचा समावेश आहे.समुपदेशनाने व पारदर्शकपणे शिक्षक बदली प्रक्रिया पार पाडण्यासाठी प्रशासन सज्ज झाले आहे. त्याअनुषंगाने सेवा ज्येष्ठतेनुसार शिक्षकांच्या याद्या अद्यावत करण्याचे काम पंचायत समितीस्तरावर सुरू आहे. पंचायत समितीमार्फत जि.प.ला यादी प्राप्त होणार असून ही यादी जि.प.च्या संकेतस्थळावर जाहीर करण्यात येणार आहे.जिल्हा परिषद शिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदल्या ऑफलाईन पध्दतीने करण्यासाठी तालुकास्तरावर वेगळी पथके नेमून अर्ज स्वीकारण्याची व्यवस्था करण्यात येणार आहे. यासाठी आवश्यकतेनुसार स्थानिक शिक्षक प्रतिनिधी, संघटना व जिल्हा परिषद पदाधिकारी यांच्याशी विचारविनिमय करावा, असेही १५ जुलै २०२० च्या राज्य शासनाच्या आदेशात नमुद आहे. बदल्या संदर्भातील हे आदेश केवळ ३१ जुलै २०२० पूर्वी करावयाच्या बदल्यांसाठीच लागू राहिल, असे ग्राम विकास विभागाने म्हटले आहे.दुर्गम शाळांचे दिवस पालटणार?जि.प. शिक्षकांची बदली प्रक्रिया दरवर्षी घेतली जाते. नियुक्ती आदेश दिल्यानंतरही अहेरी उपविभागासह दुर्गम भागातील शाळांमध्ये शिक्षकांची पदे मोठ्या प्रमाणावर रिक्त राहतात. जिल्हा, तालुकास्थळ व मोठ्या गावातील शाळांकडे शिक्षकांचा अधिकाधिक कल असतो. या बदली प्रक्रियेने दुर्गम भागातील शाळांना शिक्षक मिळणार काय, असा सवाल आहे.बोगस अपंग प्रमाणपत्राच्या आधारे मिळवतात सोयीचे ठिकाणबदली प्रक्रियेमध्ये अपंग कर्मचाºयांना सवलत असली तरी काही शिक्षक व कर्मचारी अपंगत्वाचे बोगस प्रमाणपत्र मिळवून सोयीचे ठिकाण तसेच शाळा प्राप्त करून घेत असल्याचेही दिसून येते. अपघातामुळे आलेले अपंगत्व व कायमचे अपंगत्व असे अपंगत्वाचे वर्गीकरण केले जाते. अपघाताने आलेले अपंगत्व पाच वर्षात दुरूस्त होत असते. त्यामुळे अशा कर्मचाऱ्यांना पाच वर्षानंतर बदली प्रक्रियेत मिळणाºया सवलती वगळण्याची आवश्यकता आहे. दुर्गम व नक्षलग्रस्त भागात जाण्याचे टाळण्यासाठी अनेक कर्मचारी अपघाती अपंगत्वाचे कारण पुढे करून तसे प्रमाणपत्र मिळवितात. बदली प्रक्रियेतून सोयीचे ठिकाण मिळवून घेतात. पाच वर्षानंतर पुन्हा अशाच प्रकारचे अपंगत्व प्रमाणपत्र मिळवून त्याचा बदली प्रक्रियेत वापर करतात. हा प्रकार थांबविण्यासाठी नागपूर येथील मेडीकल बोर्डाकडून अपंगत्व प्रमाणपत्राची तपासणी करणे गरजेचे आहे.
६०० वर जि.प.शिक्षकांच्या बदल्या होणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2020 5:00 AM
जिल्हा परिषद शिक्षकांच्या बदल्या यावर्षी ऑनलाईन करण्यात येत होत्या. मात्र कमी कालावधीत ही प्रक्रिया यंदा शक्य नाही. शासनाने ७ जुलै २०२० रोजी आदेश काढून सदर बदली प्रक्रिया ऑफलाईन करण्याचा निर्णय घेतला आहे. या बदली प्रक्रियेमुळे गडचिरोली जिल्ह्याच्या दुर्गम व नक्षलग्रस्त भागातील शिक्षक व कर्मचाऱ्यांना प्राधान्याने शहरी भागात व तालुक्यात बदली मिळण्याची आशा अनेकांना लागली आहे.
ठळक मुद्देऑफलाईन प्रक्रियेचे आदेश धडकले : सेवाज्येष्ठतेनुसार याद्या अद्यावत करण्याच्या कामास वेग