गडचिराेली : काेराेना संसर्ग महामारीच्या पार्श्वभूमीवर यंदाचे शैक्षणिक वर्षही ऑनलाइन एज्युकेशनवरच अवलंबून आहे. मात्र जिल्ह्यातील जवळपास ६५ टक्के शाळांमध्ये इंटरनेट पाेहाेचलेच नसल्याने आता हे शिक्षण लॅपटाॅप, माेबाइलच्या साहाय्याने सुरू आहे. मात्र जिल्ह्याच्या दुर्गम व अतिदुर्गम भागात इंटरनेट कनेक्टिव्हिटीचा अभाव असल्याने या भागात ऑनलाइन शिक्षणात माेठ्या अडचणी येत आहेत.
शाळा बंद आणि ऑनलाइन शिक्षण सुरू, असा प्रकार सुरू असल्याने ना काेणत्या विद्यार्थ्यांचा अभ्यास हाेत आहे ना काेणाला समजून येत आहे. जिल्हा परिषद शाळांना संगणक व स्मार्ट टीव्हीचा पुरवठा करण्यात आला. यामुळे अनेक शाळा डिजिटल झाल्या हाेत्या. मात्र त्यात इंटरनेट कनेक्टिव्हिटी नव्हती. त्यामध्ये साॅफ्टवेअर इन्स्टाॅल केला आहे. त्यातून विद्यार्थ्याला प्रगत केले जात हाेते. शासनाने शाळांना डिजिटल साहित्य दिले. परंतु इंटरनेट दिले नाही. वायफाय सुविधा नाही. ऑनलाइन शिक्षण सुरू करताना आर्थिक दुर्बल घटकातील विद्यार्थी, ग्रामीण भागातील दुर्गम, अतिदुर्गम भागातील व मागास विद्यार्थ्यांचा विचार शासनाने केला नाही. ऑनलाइन शिक्षण घेण्यासाठी सधन व श्रीमंत कुटुंबातील विद्यार्थ्यांना काेणतीही अडचण नाही. त्यांचे वास्तव्य शहरात व शहरालगत असून त्यांच्या पालकांनी त्यांच्यासाठी स्मार्ट फाेन, संगणक, लॅपटाॅप, इंटरनेट, वायफाय आदी सुविधा उपलब्ध करून दिल्या. मात्र माेलमजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह चालविणाऱ्या पालक या सर्व सुविधा देण्यासाठी असमर्थ आहेत. त्यांच्या मुलांचे काय, असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित हाेत आहे.
बाॅक्स...
जिल्ह्यातील एकूण शाळा - १८५८
शासकीय शाळा - १५०८
जिल्ह्यातील अनुदानित शाळा - २०४
विनाअनुदानित शाळा - १८
इंटरनेट असलेले - ७४२
इंटरनेट नसलेल्या - १११६
बाॅक्स...
ऑनलाइन शिक्षण म्हणजे काय असते रे भाऊ?
काेराेनामुळे मागील वर्षापासून शाळा पूर्णपणे बंद आहे. तसेच आमच्या गावात नेटवर्क नाही. आमच्या घरी स्मार्ट फाेन नाही. आर्थिक परिस्थिती हलाखीची असल्याने २५० ते ३०० रुपयांचा नेटपॅक घेणे शक्य नाही.
- पांडुरंग केरामी, विद्यार्थी, भामरागड
.................
माझ्या बाबांकडे स्मार्ट फाेन आहे, पण गावात नेटवर्क नसल्याने ऑनलाइन शिक्षणात अडचणी येत आहेत. शाळा प्रत्यक्ष सुरू झाल्या तर आम्हाला याेग्यरीत्या शिक्षण घेता येईल.
- प्रफुल्ल अंबादे, विद्यार्थी, अहेरी
.........................
शिक्षकांना माेबाइलचा आधार
काेविडमुळे शाळा बंद आहेत. आम्ही नियमानुसार ५० टक्के उपस्थितीत शाळेत हजर राहत आहाेत. ऑनलाइन व दूरदर्शनच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना शिकण्यासाठी प्रयत्न करावेत, असे निर्देश आहेत. पण इंटरनेट व संसाधनाचा अभाव असल्याने ऑनलाइन शिक्षणात काही विद्यार्थ्यांना अडचणी येत आहेत. इच्छा असूनही अध्यापनासाठी प्रत्येक विद्यार्थ्यापर्यंत पाेहाेचता येत नाही, याची खंत आहे.
- राजू घुगरे, मुख्याध्यापक, जि.प. शाळा, नगरी
.........................
शाळा प्रत्यक्ष बंद असून ऑनलाइन शिक्षण सुरू आहे. आम्ही आमच्या माेबाइलवरून विद्यार्थ्यांना ऑनलाइन शिक्षण देत आहाेत. पण इंटरनेटची गती कमी राहत असल्याने विद्यार्थी व पालकांची ओरड हाेत असते. शाळांचे वर्ग प्रत्यक्ष भरावे, अशी इच्छा अनेक पालकांनी आमच्याजवळ बाेलून दाखविली आहे.
- कमलाकर भाेयर, मुख्याध्यापक, जि.प. शाळा