बस सेवेचा अभाव : खासगी वाहनाने खडतर व धोकादायक प्रवास दिलीप दहेलकर । लोकमत न्यूज नेटवर्क गडचिरोली : कोरची, कुरखेडा, भामरागड, अहेरी, धानोरा, मुलचेरा तालुक्यासह जिल्हाभरातील तब्बल ६७ गावांना जाण्यासाठी पक्का रस्ता नसल्याने राज्य परिवहन महामंडळाची बस सेवा या गावापर्यंत पोहोचली नाही. परिणामी या गावातील नागरिकांना अद्यापही खासगी वाहनाने धोकादायक प्रवास करावा लागत आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने काही दिवसांपूर्वी प्राथमिक स्तरावर सर्वेक्षण करण्यात आले. त्यानंतर रस्ते नसलेल्या गावांचा अहवाल तयार करण्यात आला. सदर अहवाल राज्य परिवहन महामंडळाच्या गडचिरोली विभागीय कार्यालयाला नुकताच प्राप्त झाला आहे. या अहवालानुसार, जिल्ह्यातील तब्बल ६७ गावांना (खेडे) जाण्यासाठी रस्ता नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. या गावांना जाण्यासाठी राज्य परिवहन महामंडळाची बसफेरीही नाही. त्यामुळे या गावातील व परिसरातील प्रवाशांची प्रचंड गैरसोय होत आहे. रस्ता नसलेल्या गावांमध्ये भामरागड तालुक्यातील वासामुंडी, कहेकापरी, कोडापे, पदहूर, पोकूर, तिरकामेटा, पेरमलभट्टी, जोनावाही, मर्दहूर, वेगदूर, कोरपरशी, पुंगासूर, दिरंगी, गौरनूर, कुसनसूर, गोपनार, गुंडूरवाही, विसामुंडी, गुंडापुरी, दामनमरका, कवंडे, फोदेवाडा, अहेरी तालुक्यातील पेरकाभट्टी, तिमरम, आसली, चितवेल्ली तसेच धानोरा तालुक्यातील रायडोंगरी, मुरझर, डोंगरहूर, लाटझोरा, परसविहीर, चारवाही, दराची, बंधूर, गटानेली, पावरवेल, भटमऱ्हान, रेगादंड, पदाबोरीया आदी गावांचा समावेश आहे. मुलचेरा तालुक्यातील मोरखंडी, गंगापूर तसेच कोरची तालुक्यातील बोटेझरी, मोठा झेलिया, नारकसा, टेकामेटा, चांदागोटा, आरमोरी तालुक्यातील चवेला, कुरखेडा तालुक्यातील कुमळपार रिठ, तर गडचिरोली तालुक्यातील नागवेल्ली आदी गावांचा समावेश आहे. या गावांना जाण्यासाठी बस सुविधा नसल्याने खासगी वाहनाने क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी वाहतूक सुरू आहे. लोक प्रतिनिधी सुस्त, जिल्हा प्रशासन उदासीन ४गडचिरोली जिल्हा निर्मितीला आता ३४ वर्षाचा कालावधी उलटला आहे. मात्र गडचिरोली जिल्ह्यातील ६७ गावांना जाण्यासाठी पक्के रस्ते नाही. त्यामुळे राज्य परिवहन महामंडळाची बससेवा या गावापर्यंत पोहोचली नाही. संबंधित गावांसाठी पक्के रस्ते तयार करून बससेवा देण्याकरिता जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींनी फारसा पुढाकार घेतला नाही. या कामी जिल्हा प्रशासनही उदासीन असल्याचे दिसून येते. त्यामुळे ६७ गावातील नागरिकांना पायवाटेनेच आवागमन करावे लागत आहे. पेंढरी भागातील ३० गावे बसपासून वंचित धानोरा तालुक्यातील पेंढरीपासून छत्तीसगड राज्यातील पाखांजूरचे अंतर ३० किमी आहे.महामंडळाच्या गडचिरोली आगाराची बस गडचिरोली-पेंढरी मार्गे अहेरी जाते. तीन बसफेऱ्या असून दुपारी ३.३० वाजता गडचिरोलीवरून सुटणारी बस पेंढरी येथे मुक्कामी असते. मात्र पेंढरी गावाच्या पुढे पाखांजूरकडे महामंडळाची एकही बस जात नाही. त्यामुळे पेंढरी परिसरातील ३० ते ३५ गावे गेल्या अनेक वर्षांपासून बस सुविधेपासून वंचित आहे. पेंढरी परिसरात दोरगट्टा, दूर्गापूर, झाडापापडा, बोटेहूर तसेच इतर गावांचा समावेश आहे. पेंढरीच्या पुढे महामंडळाची बस जात नसल्याने एटापल्ली तालुक्यातील काही गावे बस सुविधेपासून वंचित आहे. पेंढरी ते पाखांजूर अशी खासगी बससेवा चालते. तसेच छत्तीसगड बस महामंडळाच्या बसफेऱ्याही सुरू आहेत. पेंढरी भागातील लोकांचा छत्तीसगड राज्याच्या पाखांजूर परिसरातील नागरिकांशी नेहमी संबंध येतो. महाराष्ट्र व छत्तीसगड या दोन राज्यात रोटीबेटी तसेच बाजारपेठेच्या माध्यमातून आर्थिक व्यवहार सुरू आहे. मात्र पेंढरीच्या पुढे पाखांजूरकडे महामंडळाची बस नसल्याने प्रवास करण्यास नागरिकांना मोठी अडचण जात आहे. परिणामी पेंढरी भागातील नागरिकांना खासगी वाहनाने धोकादायक प्रवास करावा लागत आहे. महाराष्ट्राच्या परिवहन महामंडळाने बससेवा सुरू करावी, अशी मागणी पाखांजूर येथील सुकलाल सरकार यांनी केली आहे. परमिट नसल्याने बससेवा नाही महामंडळाच्या गडचिरोली आगाराची बसफेरी गडचिरोलीवरून पेंढरीपर्यंत जाते. मात्र पेंढरीच्या पुढे छत्तीसगड राज्यातील पाखांजूरकडे जात नाही. गडचिरोली-पेंढरी-पाखांजूर हा मार्ग सुस्थितीत आहे. मात्र छत्तीसगड राज्यात बससेवा देण्यासाठी एमएसआरटीसीला परमिट नाही. त्यामुळे गडचिरोली आगाराला पेंढरीच्या पुढे पाखांजूरकडे बससेवा देता येत नाही. सीजीएसआरटीसी व एमएसआरटीसीची संयुक्त बैठक होऊन त्यात मान्यता मिळणे गरजेचे आहे. त्यानंतर बस वाहतुकीचा परवाना मिळाल्यानंतर बससेवा सुरू होऊ शकते, अशी माहिती गडचिरोलीच्या एसटी विभागीय कार्यालयाकडून प्राप्त झाली आहे. महाराष्ट्र व छत्तीसगड राज्यातील लोकांचा रोटीबेटी व्यवहार आहे. तसेच विविध वस्तू खरेदीच्या माध्यमातून आर्थिक व्यवहारही आहे. मात्र राज्य परिवहन महामंडळाची बस सेवा पेंढरीनंतर छत्तीसगड राज्यातील पाखांजूरपर्यंत नाही. त्यामुळे पेंढरी परिसरातील २५ ते ३० गावांसाठी बससुविधा नाही. परिणामी या भागातील नागरिकांची प्रचंड गैरसोय होते. त्यामुळे राज्य परिवहन महामंडळाने गडचिरोली-पाखांजूर अशी बसफेरी सुरू करावी. - श्रीनिवास दुलमवार, सदस्य, गट्टा-पेंढरी जि.प. क्षेत्र
६७ गावे रस्त्यांविना
By admin | Published: July 09, 2017 2:34 AM