लोकमत न्यूज नेटवर्कमुलचेरा : तालुक्यातील मल्लेरा कोठारी जंगल परिसरातून तेलंगणा राज्यात कत्तलीसाठी घेवून जाणाऱ्या तब्बल ६८ जनावरांना तस्करांच्या तावडीतून अहेरी उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांच्या पथकाने जीवदान दिल्याची घटना बुधवारी पहाटेच्या सुमारास घडली.मुलचेरा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मल्लेरा व कोठारी जंगलातून गोधन तस्करी सुरू असल्याची माहिती अहेरीचे उपविभागीय पोलीस अधिकारी बजरंग देसाई यांना मिळाली. या माहितीच्या आधारे एसडीपीओ देसाई यांनी आपल्या पथकाला मध्यरात्रीपासून गस्तीवर ठेवले. दरम्यान पहाटेच्या सुमारास तस्कर ६८ जनावरे घेवून जंगलातून जात होते. पोलिसांनी त्यांच्या तावडीतून ६८ जनावरांना जप्त केले. मात्र घनदाट जंगलाचा फायदा घेत आरोपी फरार झाले. या परिसरातील उपविभागीय पोलीस अधिकाºयांची ही दुसरी कारवाई असून मागील महिन्यात १७ सप्टेंबर रोजी सात जनावरांना तस्करांच्या तावडीतून सोडविण्यात त्यांना यश आले होते.छत्तीसगड राज्यातून तेलंगणा राज्यात कत्तलीसाठी घेऊन जाण्यास या मार्गाचा सर्रास उपयोग होत आहे. मागील अनेक वर्षांपासून हा गोरखधंदा सुरू आहे. यापूर्वी तालुक्यातील विविध गावातील लोकांनी जनावरे पकडून कोंडवाड्यात टाकल्याच्या घटना घडल्या आहेत. नव्याने रूजू झालेले उपविभागीय पोलीस अधिकारी बजरंग देसाई यांनी या प्रकरणाकडे विशेष लक्ष दिले आणि कारवाई केली.सर्व जनावरांना कोठारी येथील कोेंडवाड्यात जमा करण्यात आले असून त्यांना गो-शाळेत पाठविण्यात येणार आहे. मुलचेरा तालुक्यातील लगाम जवळून वाहणारी प्राणहिता नदी ओलांडून थेट तेलंगणा राज्यात जनावरांची तस्करी केली जाते. श्रीनगर-कोठारी-लगाम हा परिसर घनदाट जंगलाने व्यापलेला असून तस्करांना सोयीस्कर असल्याने सर्रास जनावरांची तस्करी केली जात आहे.सदर कारवाई अहेरीचे उपविभागीय पोलीस अधिकारी बजरंग देसाई यांच्या मार्गदर्शनात पोलीस कर्मचारी कुनघाडकर, बिट्टूरवार यांनी केली.
६८ जनावरांची मुक्तता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 11, 2018 1:23 AM
तालुक्यातील मल्लेरा कोठारी जंगल परिसरातून तेलंगणा राज्यात कत्तलीसाठी घेवून जाणाऱ्या तब्बल ६८ जनावरांना तस्करांच्या तावडीतून अहेरी उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांच्या पथकाने जीवदान दिल्याची घटना बुधवारी पहाटेच्या सुमारास घडली.
ठळक मुद्देएसडीपीओ पथकाची कारवाई : कत्तलीसाठी नेत होते