स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध अधिकार आहे आणि तो मी मिळविणारच अशी सिंहगर्जना करून भारतीयांमध्ये इंग्रजांविरोधात असंतोष निर्माण करण्यासाठी लोकमान्य टिळकांनी गणेशोत्सवाची सुरुवात केली. त्यानंतर देशभरात विशेषतः महाराष्ट्रात सार्वजनिक व कौटुंबिक गणेशोत्सवाची सुरुवात झाली. तेच लोण आरमोरी शहरापर्यंत पोहचून आरमोरी शहरात गणेशोत्सवाला मोठ्या उत्साहात साजरा करण्याची परंपरा सुरू झाली. परंतु स्वातंत्र्य प्राप्तीनंतर या उत्सवाला खरे स्वरूप प्राप्त झाले.
१९५०च्या दरम्यान म्हणजे ६९ वर्षांपूर्वी आरमोरी येथील नेहरू चौकात जमिनीतून गणेशमूर्ती बाहेर आली. सदर गणेशमूर्ती त्याच ठिकाणी प्रतिष्ठापित करण्यात आली. त्यानंतर काही वर्षांतच तेथे गणेश मंदिराची निर्मिती करण्यात आली. या कामी बैरवार, दिनकर हेमके यांनी पुढाकार घेऊन मंदिर निर्मितीस व प्राणप्रतिष्ठेस सहकार्य केले. त्यानंतर मंदिराची देखभाल , वामन देवीकर, दिलीप हेमके, राजू अंबानी,संजय हेमके, चंद्रशेखर पप्पूलवार आदी करीत आहेत.
मंदिरात विविध प्रकारचे धार्मिक कार्यक्रम वर्षभर साजरे केले जातात. सामूहिक तुळशी विवाह, रक्तदान शिबिर यांसह विविध सामाजिक व धार्मिक उपक्रम सुरू केले जातात. त्यामुळे दर्शनासाठी भाविकांची वर्दळ होत असते. नेहरू चौकातील युवकांनी एकत्र येऊन धार्मिक परंपरा जपण्यासाठी अष्टविनायक गणेश उत्सव मंडळाची स्थापना केली. दरवर्षी या उत्सव मंडळाद्वारे गणेशोत्सव मोठ्या धुमधडाक्यात साजरा केला जातो. परंतु मागील वर्षीपासून कोरोनाचे संकट आल्याने धार्मिक कार्यक्रम बंद ठेवण्यात आले आहे. यावर्षी सुद्धा अगदी साध्या पद्धतीने गणेशोत्सव साजरा केला जात आहे. यावर्षी या उत्सवाची ६९ वर्षांची परंपरा आहे.
130921\img-20210913-wa0039.jpg
आरमोरी येथील नेहरू चौकातील गणेश मंदिरातील पुरातन मूर्ती