गडचिरोली/हैदराबाद : तेलंगणा-छत्तीसगड सीमेवरील मुलुगु जिल्ह्याच्या एटुरनगरम चालपाका जंगल परिसरात रविवारी पहाटे पाच वाजता तेलंगणा पोलिसांच्या ग्रेहाउंड्स या नक्षलविरोधी पथकाशी झालेल्या चकमकीत २० लाख रुपयांचे बक्षीस असलेला एक जहाल नक्षली व एका महिलेसह सात माओवादी ठार झाले. चकमकीनंतर घटनास्थळावरून दोन एके-४७ रायफलींसह मोठ्या प्रमाणात दारूगोळा व शस्त्रसाठा जप्त करण्यात आला. महाराष्ट्राच्या शेवटच्या टोकावरील सिरोंचा तालुक्यातील असरअल्लीपासून हे घटनास्थळ ६० किलोमीटर अंतरावर आहे.
कुरुसम मंगू उर्फ भद्रू उर्फ पपण्णा (३५), इगोलापू मल्ल्या ऊर्फ मधु (४३), मुसाकी देवल ऊर्फ करुणाकर (२२), मुसाकी जमुना (२३), जयसिंग (२५), किशोर (२२) आणि कामेश (२३) हे ठार झाले. मंगू हा प्रतिबंधित सीपीआय (माओवादी)च्या तेलंगणा समितीचा सचिव होता. मुलुगु जिल्ह्यातील चालपाका वनक्षेत्रातील जंगलांमध्ये मोठे नक्षलवादी नेते एकवटल्याची माहिती मिळाली होती. सुरक्षा दलाची तुकडी शोधासाठी पाठवली असता नक्षलवाद्यांनी गोळीबार सुरू केला. त्यांना जवानांनी चोख प्रत्युत्तर दिले.
ग्रेहाउंड्स कोण आहेत?
ग्रेहाउंड्स हे आंध्र प्रदेश आणि तेलंगणा पोलिस दलांचे माओवादविरोधी पथक आहे. १९८८ मध्ये आंध्र पट्ट्यातील माओवाद्यांचा मुकाबला करण्यासाठी याची स्थापना करण्यात आली होती. ग्रेहाउंड्सना नक्षलवादी आणि माओवाद्यांविरुद्ध बंडखोरीविरोधी कारवायांमध्ये प्रशिक्षित केले जाते.