ऑनलाईन लोकमतगडचिरोली : जिल्ह्यातील ९ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक आणि २२ ग्रामपंचायतींच्या पोटनिवडणुकीसाठी मंगळवारी (दि.२७) झालेल्या मतदानात ७०.१७ टक्के मतदारांनी सहभाग घेतला. एकूण ७१ उमेदवारांसाठी झालेल्या यात निवडणुकीत सर्वात कमी म्हणजे ३६.७१ टक्के मतदान धानोरा तालुक्यात व ४२.७७ टक्के मतदान गडचिरोली तालुक्यात झाले. बुधवारी या निवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे.एकूण ३५ केंद्रांवर बुधवारी शांततेत मतदान प्रक्रिया झाली. मात्र काही ठिकाणी मतदार याद्यांमध्ये गडबडीच्या घटना उघडकीस आल्या. सकाळी ७.३० वाजता सुरू झालेले मतदान दुपारी ३ वाजता आटोपते घेण्यात आले. सर्वाधिक ८६.७८ टक्के मतदान सिरोंचा तालुक्यात झाले हे विशेष. एकूण ५३ केंद्रांपैकी १७ मतदान केंद्र अतिसंवेदनशिल तर १८ संवेदनशिल होते. त्यामुळे पोलिसांच्या वतीने त्या केंद्रांवर सशस्त्र पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात आला होता. त्यामुळे कोणतीही अनुसूचित घटना घडली नसल्याचे प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले.दुपारी निवासी उपजिल्हाधिकारी दुर्वेश सोनवणे व निवडणूक विभागाचे नायब तहसीलदार सुनील चडगुलवार यांनी गडचिरोली तालुक्यातील ५ केंद्रांना भेटी देऊन मतदान प्रक्रियेची पाहणी केली.मुलचेरा : मुलचेरा तालुक्यातील विवेकानंदपूर ग्रामपंचायतीमध्ये एका जागेसाठी वार्ड क्रमांक ४ मध्ये पोट निवडणूक घेतली जात आहे. ग्रामपंचायत सदस्य सतीश विधाते हे पंचायत समिती सदस्य निवडून आल्याने त्यांची जागा रिक्त झाली होती. १ हजार ११२ एकूण मतदारांपैकी दुपारी १.३० वाजेपर्यंत ५१९ मतदारांनी मतदान केले. यामध्ये २९७ पुरूष व २२२ महिलांचा समावेश आहे. ३ वाजेपर्यंत एकूण ६०६ मतदारांनी मतदान केले. मतदानाची टक्केवारी ५४.४९ टक्के एवढी आहे.जिमलगट्टा : जिमलगट्टा ग्रामपंचायतमध्ये वार्ड क्रमांक ३ मध्ये पोटनिवडणूक घेण्यात आली. एकूण ४६४ मतदार आहेत. या वार्डात पानेमवार आशा किशोर, उल्लीपवार संगीता महेश, गजमवार दीपाली अशोक हे उमेदवार रिंगणात आहेत. निवडणुकीदरम्यान पोलिसांतर्फे चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. जिल्हा परिषद शाळेत मतदान केंद्र ठेवण्यात आले आहे. जिमलगट्टा येथे ७७.८० टक्के मतदान झाले.मुरूमगाव : मुरूमगाव येथील प्रभाग क्रमांक ३ करिता निवडणूक घेण्यात आले. या ठिकाणी ७५.५२ टक्के मतदान झाले आहे. एकूण ४७४ मतदारांपैकी १८४ पुरूष व १७४ महिला अशा एकूण ३५८ मतदारांनी मतदान केले. या प्रभागात भाजपातर्फे सुकेंद्र बैसाकुराम कोटपरीया व काँग्रेसतर्फे कृष्णाबाई दयालूराम मल्ला या दोन उमेदवारांमध्ये लढत आहे. निवडणूक अधिकारी म्हणून आर. एन. चौधरी, मतदान अधिकारी म्हणून टी. ई. डोईजड, आर. एस. खरवडे, नंदकिशोर नैताम, खेचरस्वामी कुमरे यांनी कर्तव्य बजाविले. मतदान केंद्राच्या परिसरात पोलीस प्रभारी अधिकारी दानिश मन्सुरी यांच्या मार्गदर्शनात पीएसआय राजेश थोरात व त्यांच्या पथकाने चोख पोलीस बंदोबस्त ठेवला होता.जोगीसाखरा : जोगीसाखरा येथील वार्ड क्रमांक १ मध्ये पोटनिवडणूक घेण्यात आली. या निवडणुकीत किशोर प्रधान, लालाजी मैंद, खुमा गरफडे हे तीन उमेदवार रिंगणात आहेत. निवडणूक अधिकारी म्हणून रायपुरे यांनी काम पाहिले.एटापल्ली : हालेवारा ग्रामपंचायतीचा ११ सदस्य, एक सरपंच या पदांसाठी निवडणूक घेण्यात आली. या ठिकाणी ७१.८८ टक्के मतदान झाले. तोडसा ग्रामपंचायतीच्या दोन जागांसाठी पोटनिवडणूक झाली. या ठिकाणी ५५.८० टक्के मतदान झाले. पोलिंग पाट्यांचीी ने-आण करण्यासाठी हेलिकॉप्टरचा वापर करण्यात आला.आष्टी : आष्टी परिसरातील अनखोडा, मार्र्कंडा (कं.) व वायगाव येथे निवडणूक घेण्यात आली. अनखोडा येथे ६९३ पैकी ५३० मतदारांनी मतदान केले. मतदानाची टक्केवारी ७६.४८ एवढी आहे. मार्र्कंडा (कं.) येथे एकूण ५२८ मतदार आहेत. त्यापैकी २७८ मतदारांनी मतदान केले. मतदानाची टक्केवारी ५२.६५ एवढी आहे. वायगाव येथे ९२८ मतदारांपैकी ५६१ मतदारांनी मतदान केले. मतदानाची टक्केवारी ६०.४५ एवढी आहे. मार्र्कंडा (कं.) येथील मतदार यादीत घोळ निर्माण झाल्याने काही मतदारांची नावे मतदार यादीत मिळत नव्हती.कोरची : कोरची तालुक्यातील कोटरा येथे एकूण १ हजार २४९ मतदार आहेत. त्यापैकी ९६२ मतदारांनी मतदान केले. मतदानाची टक्केवारी ७७.०२ आहे. नवेझरी येथे ८१.१९ टक्के मतदान झाले. बोदालदंड येथे ८२.०८ टक्के, दवंडी येथे ८१.०२ टक्के, कोचीनारा पोट निवडणुकीत ६०.९८ टक्के मतदान झाले.आज निकाल जाहीर होणारमंगळवारी झालेल्या निवडणुकीतील ७१ उमेदवारांच्या भाग्याचा फैसला बुधवार दि.२८ ला ठरणार आहे. सार्वत्रिक व पोटनिवडणुकीची मतमोजणी संबंधित तालुक्याच्या मुख्यालयी होणार आहे. मोजकेच उमेदवार असल्यामुळे काही वेळातच निकाल जाहीर होईल. १४३ जागांवरील उमेदवारांची अविरोध निवड होत आहे. तर ४३४ जागांवर कोणीच नामांकन दाखल केले नसल्यामुळे त्या जागा रिक्त राहणार आहेत.निवडणूक विभागाची धांदलसदर निवडणुकीची प्रक्रिया नियंत्रित करण्यासाठी जिल्हास्तरावर केवळ एक नायब तहसीलदार आणि एक वरिष्ठ लिपिक असे दोघेच धावपळ करीत होते. उपजिल्हाधिकाºयाचे पद अनेक महिन्यांपासून रिक्त आहे. परिणामी निवडणुकीच्या रिंगणातील एकूण उमेदवार किती याचा नेमका आकडा या विभागाला मतदानाच्या तारखेपर्यंत काढता आला नाही. सोमवारी सार्वत्रिक निवडणुकीसाठी ३८ उमेदवार प्रत्यक्षात रिंगणात असल्याचे सांगण्यात आले होते, मात्र मंगळवारी हाच आकडा ४७ असल्याचे जाहीर करण्यात आले. पुरेशा मनुष्यबळाअभावी तालुकास्तरावरून विविध आकडे घेताना त्यांची धांदल उडत होती.
ग्रामपंचायतींसाठी ७०.१७ टक्के मतदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 28, 2018 12:45 AM
जिल्ह्यातील ९ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक आणि २२ ग्रामपंचायतींच्या पोटनिवडणुकीसाठी मंगळवारी (दि.२७) झालेल्या मतदानात ७०.१७ टक्के मतदारांनी सहभाग घेतला.
ठळक मुद्देगडचिरोली व धानोरा तालुक्यात अल्पप्रतिसाद : ७१ उमेदवारांचे भाग्य ईव्हीएममध्ये बंद