गडचिरोली : आधारभूत खरेदी योजनेंतर्गत १ नोव्हेंबर २०१४ ते ३० जून २०१५ या कालावधीत धान खरेदीचे शासनाने आदेश निर्गमित केले आहे. त्यानुसार जिल्ह्यात ५ नोव्हेंबरपासून एकूण ७२ धान खरेदी केंद्र सुरू करण्यात आले आहे. आधारभूत खरेदी किंमत योजनेंतर्गत जिल्ह्यात प्रादेशिक व्यवस्थापक आदिवासी विकास महामंडळ यांच्यामार्फतीने ४६ धान खरेदी केंद्र, आदिवासी विकास महामंडळाच्या अहेरी उपप्रादेशिक व्यवस्थापकामार्फत २२ केंद्र सुरू करण्यात आले आहे. तसेच जिल्हा मार्केटींग अधिकारी गडचिरोली यांच्यामार्फतीने चार केंद्र सुरू करण्यात आले आहे. अ श्रेणीच्या धानाला १ हजार ४०० रूपये प्रतिक्विंटल तर साधारण श्रेणीच्या धानाला १ हजार ३६० रूपये प्रतिक्विंटल धान जाहीर करण्यात आला आहे. आर्दतेचे अधिकत्तम प्रमाण धानासाठी १७ टक्के विहीत करण्यात आले आहे. शासनाच्या निर्देशानुसार आधारभूत खरेदी किंमत योजनेंतर्गत प्रादेशिक व्यवस्थापक आदिवासी विकास महामंडळ, उपप्रादेशिक व्यवस्थापक अहेरी व जिल्हा मार्केटींग अधिकारी गडचिरोली यांच्या मार्फतीने ५ नोव्हेंबरपासून या ७२ धान खरेदी केंद्रावर धान खरेदी सुरू करण्यात आली आहे. इच्छुक शेतकऱ्यांनी धान विक्रीसाठी आणतांना सातबारा मूळप्रतीसह एफएक्यू दर्जाचे सुकलेले व स्वच्छ केलेले धान केंद्रावर आणावेत. जेणे करून ते नाकारले जाणार नाही, असे आवाहन जिल्हाधिकारी यांनी केले आहे. आधारभूत खरेदी योजनेंतर्गत धान खरेदी केंद्र सुरू होण्यापूर्वी खासगी विक्रेते शेतकऱ्यांना कमी भाव देऊन लूट करीत होते. (स्थानिक प्रतिनिधी)
आधारभूत खरेदी योजनेंतर्गत ७२ केंद्र सुरू
By admin | Published: November 11, 2014 10:40 PM