१ हजार ८ घरकुले होणार : गृहनिर्माण प्राधिकरण घालणार लक्षदिलीप दहेलकर गडचिरोली‘सर्वांसाठी घरे’ या संकल्पनेवर आधारित प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत गडचिरोली नगर पालिका प्रशासनाने २३ मार्च रोजी १ हजार ८ घरकुलांचा समावेश असलेल्या ७५ कोटी ९२ लाख रूपयांचा प्रस्ताव महाराष्ट्र गृहनिर्माण क्षेत्रविकास प्राधिकरणाच्या मुख्य अभियंत्यांकडे मंजुरीसाठी पाठविला आहे. या प्रस्तावाला मान्यता मिळाल्यानंतर येत्या काही दिवसात घरकुलाचा प्रश्न मार्गी लागणार आहे.प्रधानमंत्री आवास योजनेच्या घरकूल बांधकामासंदर्भात आॅक्टोबर महिन्यात शहराच्या मागास भागात सर्वेक्षण करण्यात आले होते. त्यानंतर पालिकेच्या आवाहनाला प्रतिसाद देत हजार वर नागरिकांनी घरकुलाच्या लाभासाठी अर्ज सादर केले होते. रामदेवबाबा चॅरीटेबल सोसायटीच्या माध्यमातून शहरातील सर्वोदय वार्ड, फुले वार्ड, इंदिरानगर, विवेकानंदनगर गोकुलनगर, विसापूर व इतर मागास भागात प्रत्यक्ष सर्वेक्षण करण्यात आले होते. सदर सर्वेक्षणादरम्यान किती कुटुंबाकडे राहण्यासाठी पक्के घर नाही, कोण गरजू आहे, त्यांची आर्थिक परिस्थिती याबाबतचा तपशील विस्तृतपणे घेण्यात आला. सर्वेक्षण पूर्ण झाल्यानंतर रामदेवबाबा चॅरीटेबल सोसायटीच्या वतीने नगर पालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांना कृती आराखडा (डीपीआर) सादर करण्यात आला. त्यानंतर नगर पालिकेच्या सर्वसाधारण सभेत सदर आराखडा व घरकुलाच्या बांधकामाला मंजुरी प्रदान केली. घरकुलाच्या बांधकामाचे संपूर्ण नियोजन पूर्ण झाल्यानंतर पालिकेचे मुख्याधिकारी कृष्णा निपाने यांनी आवश्यक असलेला निधी व घरकुलाच्या संख्येचा समावेश असलेला प्रस्ताव मंजुरीसाठी महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्र विकास प्राधिकरणाकडे सादर केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ग्रामीण व शहरी भागासाठी घरकूल योजना कार्यान्वित केली आहे. नगर पालिकेच्या क्षेत्रात या योजनेंतर्गत घरकूल मंजूर झालेल्या लाभार्थ्याला अडीच लाख रूपयांचे अनुदान शासनाकडून मिळणार आहे. गरजू व बेघर असलेल्या लोकांना हक्काचे घर मिळावे या उद्देशाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ही महत्त्वाकांक्षी योजना कार्यान्वित केली आहे. फौजदारी कारवाई होणारसन २०१०-११ व २०११-१२ या वर्षात रमाई घरकूल योजनेंतर्गत गडचिरोली शहरातील अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांसाठी घरकूल मंजूर करण्यात आले होते. मात्र यापैकी काही लाभार्थ्यांनी अनुदानाची रक्कम मिळाल्यानंतरही घरकुलाचे बांधकाम केले नाही. रमाई घरकूल योजनेंतर्गत पालिका प्रशासनाने लाभार्थ्यांना ७५ हजार रूपयांचा पहिला हप्ता अदा केला होता. सदर रक्कम प्राप्त होऊनही काही लाभार्थ्यांनी घरकुलाचे बांधकाम केले नाही. संबंधित लाभार्थ्यांना पालिकेच्या वतीने दोनदा नोटीस बजाविण्यात आली आहे. मात्र त्यानंतरही संबंधित लाभार्थ्यांकडून घरकूल कामाबाबत कोणतीही कार्यवाही झाली नाही. अशा लाभार्थ्यांकडून शासकीय निधीचा अपहार केल्याच्या कारणावरून संबंधिताविरोधात गडचिरोली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात येणार आहे. संबंधित लाभार्थ्यावर फौजदारी कारवाई करण्यात येणार आहे, अशी माहिती मुख्याधिकारी कृष्णा निपाने यांनी लोकमतशी बोलताना दिली.नगर विकास मंत्रालयाकडून मिळणार अंतिम मंजुरीगडचिरोली नगर पालिका प्रशासनाने १ हजार ८ घरकुलांचा प्रस्ताव महाराष्ट्र गृहनिर्माण प्राधिकरणाच्या मुख्य अभियंत्याकडे मंजुरीसाठी सादर केला आहे. म्हाडाकडून प्रस्तावाला मंजुरी मिळाल्यानंतर सदर प्रस्ताव केंद्र शासनाच्या हुडको कार्यालयाकडे पाठविला जाणार आहे. त्यानंतर येथून सदर प्रस्ताव नगर विकास मंत्रालय दिल्ली यांच्याकडे अंतिम मंजुरीसाठी सादर करण्यात येणार आहे. सदर सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर घरकूल बांधकामासाठी अनुदानापोटी पुरेसा असलेला निधी गडचिरोली पालिकेला प्राप्त होणार आहे.त्यानंतर घरकुल बांधकामास प्रत्यक्ष प्रारंभ होईल.प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत गडचिरोली शहरातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील गरजू लाभार्थ्यांना घरकुलाचा लाभ देण्यासाठी नगर पालिका प्रशासनातर्फे १ हजार ८ घरकुलाचा समावेश असलेला प्रस्ताव प्रकल्प अहवाल व कृती आराखड्यासह गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणाकडे २३ मार्च रोजी सादर करण्यात आला आहे. या योजनेंतर्गत मिळणारे घरकूल कुटुंबातील कर्ती महिला अथवा कुटुंबातील कर्ता पुरूष व महिला यांच्या संयुक्त नावावर राहिल. सदर योजनेची अंमलबजावणी करण्यासाठी न.पं.चा शासनस्तरावर पाठपुरावा सुरू आहे.- कृष्णा निपाने, मुख्याधिकारी, नगर परिषद गडचिरोली
घरकूल योजनेचा ७५ कोटींचा प्रस्ताव सादर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 26, 2017 12:40 AM