लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : पालक नसल्याने निराधार बनलेल्या किंवा पालक असूनही मुलांचे पालन पोषण करण्याची क्षमता नसलेली बालके बालसंगोपन गृहात ठेवली जातात. गडचिरोली जिल्ह्यातील चार बाल संगोपन गृहात एकूण ७५ बालके आहेत. सदर बाल संगोपन गृह त्यांच्यासाठी आधारवड ठरले आहेत.बदलत्या समाज व्यवस्थेत बालकांचे प्रश्न गंभीर होत चालले आहेत. बाल मनावर विपरित परिणाम झाल्यास सदर बालक गुन्हेगारीकडे वळण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे निराधार बालकांना आश्रय देऊन त्यांना शिक्षण देणे व त्यांच्यावर चांगले संस्कार होणे अतिशय आवश्यक आहे. ही बाब लक्षात घेऊन राज्य शासनाच्या वतीने बाल संगोपन गृह चालविले जातात. या बाल संगोपन गृहांमध्ये निराधार बालकांना प्रवेश दिला जातो. गडचिरोली जिल्ह्यात गडचिरोली येथे बाल संगोपन व निरिक्षण गृह आहे. या ठिकाणी १५ बालके आहेत. त्याचबरोबर खासगी संस्थांच्या मार्फत घोट, मुलचेरा व देसाईगंज येथे बाल संगोपन गृह चालविले जातात. घोट येथील बाल संगोपन गृहात २० मुली, मुलचेरा येथील बाल संगोपन गृहात ३० मुली व देसाईगंज येथील बाल संगोपन गृहात १० मुली आहेत.बाल संगोपन गृहात राहणाºया बालकांचे पालन पोषण करण्याबरोबरच त्यांना जवळपासच्या शाळेमध्येही पाठविले जाते. त्यामुळे त्यांचे संगोपन होण्याबरोबरच त्यांच्यावर चांगले संस्कार होण्यास मदत होत आहे. या बाल संगोपन गृहात ६ ते १८ वयापर्यंतच्या मुलांना ठेवले जाते. बाल संगोपन गृहातून बाहेर पडल्यानंतर जीवन जगण्यासाठी ते स्वत: सक्षम व्हावे, यासाठी त्यांना एखाद्या रोजगाराचे धडेही दिले जात आहेत. आजपर्यंत अनेक बालके बाल संगोपन गृह सोडल्यानंतर स्वत:चा रोजगार थाटून जीवन जगत आहेत.अनुदानात वाढ करणे गरजेचेबाल संगोपन गृह चालविणाºया संस्थांना प्रती बालक १२०० रूपये मासिक अनुदान दिले जाते. वाढत्या महागाईमध्ये सदर अनुदान तुटपुंजे असल्याने अनुदानामध्ये वाढ करणे आवश्यक आहे.या मुलांना ठेवले जाते बाल संगोपनगृहातआई-वडील नसलेल्या निराधार बालकांना बाल संगोपन गृहात ठेवले जाते. त्याचबरोबर एखाद्या बालकाला पालक असूनही त्याचे आई-वडील त्याचे पालन पोषण करण्यास सक्षम नसल्यास सदर बालकाला बाल संगोपन गृहात प्रवेश दिला जातो. निराधार बालकाबाबतची माहिती प्राप्त झाल्यानंतर बाल कल्याण विभागाचे अधिकारी चौकशी करून बालकाला संगोपन गृहात आणतात.नागरिकांनी त्यांच्या वाढदिवसानिमित्त बाल संगोपन गृहातील बालकांना एखादी भेटवस्तू द्यावी. त्यामुळे बालकांमधील निराधारपणाची भावना कमी होण्यास मदत होईल. निराधार बालक आढळल्यास महिला व बाल कल्याण विभागाशी संपर्क साधावा.- अतुल भडांगे, जिल्हा महिला व बाल कल्याण अधिकारी
बालसंगोपनगृहात ७५ निराधारांना आधार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 13, 2017 11:29 PM
पालक नसल्याने निराधार बनलेल्या किंवा पालक असूनही मुलांचे पालन पोषण करण्याची क्षमता नसलेली बालके बालसंगोपन गृहात ठेवली जातात.
ठळक मुद्देबाल कल्याण विभागाचा उपक्रम : पालन पोषणाबरोबरच दिले जात आहे शिक्षणबाल दिन विशेष