नियंत्रण अधिकाऱ्यांची नेमणूक : शाळेचा पहिला दिवस पुस्तक दिन म्हणून साजरा होणारगडचिरोली : सर्व शिक्षा अभियानांतर्गत गडचिरोली तालुक्यातील जिल्हा परिषद, नगर परिषद व खासगी अनुदानित शाळांमधील इयत्ता पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना शाळेच्या पहिल्या दिवशी पाठ्यपुस्तके वितरित करण्यात येणार आहे. गडचिरोली गटसाधन केंद्रातून तालुक्यातील सर्वच नऊ केंद्रस्तरावरील शाळांमध्ये तब्बल ७६ हजार पाठ्यपुस्तके मंगळवारी व बुधवारी पोहोचली.गडचिरोलीचे गटशिक्षणाधिकारी उद्धव डांगे यांनी सन २०१६-१७ या शैक्षणिक सत्रात सर्व शिक्षा अभियानांतर्गत विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तके वितरित करण्याबाबतचे नियोजन करण्यात आले आहे. गडचिरोली तालुक्यासाठी येथील गटसाधन केंद्रात ७६ हजार पाठ्यपुस्तकांचा काही दिवसांपूर्वी पुरवठा करण्यात आला. या गटसाधन केंद्रातून केंद्रस्तरावरील शाळांमध्ये पाठ्यपुस्तके पोहोचता करण्यासाठी गटसाधन केंद्राच्या वतीने नियोजन करण्यात आले. सर्व केंद्र प्रमुखांनी २० जूनपर्यंत प्रत्येक शाळांमध्ये पाठ्यपुस्तके पोहोचता करावीत, तसे प्रमाणपत्र गटसाधन केंद्राच्या कार्यालयात सादर करावे, शाळांच्या मुख्याध्यापकांनी वर्ग व विद्यार्थीनिहाय पाठ्यपुस्तके वितरणाचे नियोजन करावे, असे आवाहन गटशिक्षणाधिकारी उद्धव डांगे यांनी केली आहे. २७ जून २०१६ रोजी शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांना जि. प., पं. स. सदस्य, गावातील प्रतिष्ठीत नागरिक तसेच शाळा व्यवस्थापन समितीच्या पदाधिकाऱ्यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तकाचे वितरण करण्यात येणार आहे. शाळेचा पहिला दिवस पुस्तक दिवस म्हणून साजरा करण्यात येणार आहे. सदर पाठ्यपुस्तक पडताळणीबाबत जिल्हा व तालुका नियोजन अधिकारी यांची नियंत्रण अधिकारी म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. २१ ते ३० जून या कालावधीत सदर नियोजन अधिकारी तालुक्यातील सर्व शाळांना भेटी देऊन शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तके वितरित करण्यात आले किंवा नाही, याची शहानिशा करणार आहेत. तसेच कार्यालयीन दस्तावेजाची तपासणी करणार आहेत. (स्थानिक प्रतिनिधी)
७६ हजार पाठ्यपुस्तके केंद्रस्थळी पोहोचली
By admin | Published: June 03, 2016 1:16 AM