मिळालेल्या माहितीच्या आधारे आसरअल्ली वनक्षेत्रातील कर्मचाऱ्यांनी गस्तीदरम्यान पहाटे २ ते ३ वाजताच्या दरम्यान सोमनपल्लीकडून सिरोंचाकडे येणाऱ्या वाहनाची तपासणी करीत असताना एका वाहन चालकाने वाहन न थांबविता वेगाने पळून जाण्याचा प्रयत्न केला.
तेव्हा वन कर्मचारी यांनी सदर वाहनाचा पाठलाग केला. आसरअल्ली पासून २ किलोमीटर अंतरावर वाहन थांबवून त्याची तपासणी केली असता सदर वाहनांमध्ये सागाचे ५० नग (६.८३० घ.मी) ४७९१८६ रूपये किमतीचा माल मिळून आला.
सदर माल अवैधरित्या तेलंगणा राज्यात वाहतूक केला जात असल्यामुळे भारतीय वन अधिनियम १९२७ चे कलम ४१ व महाराष्ट्र वन नियमावली २०१४ चे कलम ३१ अन्वये ८२ अन्वये वाहन चालकाच्या नावाने वन गुन्हा क्रमांक ८१५/१६ - ७ मार्च राेजी दाखल करण्यात आला आहे.
त्याचबरोबर वन गुन्ह्यात वापरण्यात आलेले दोन वाहने हे कलम ५२ (१)अंतर्गत जप्त करण्यात आलेले आहे. सदर आंतरराज्य साग तस्करी प्रकरणी पुढील तपास वनपरिक्षेत्राधिकारी सिरोंचा यांचेतर्फे सुरू आहे. तसेच दुसऱ्या घटनेमध्ये ७ मार्च राेजी सायंकाळी ५ वाजता वनपरिक्षेत्रातील कोपेला उपवन क्षेत्रातील कक्ष क्रमांक ३१३ मध्ये अवैध वृक्षतोड व अवैध साग माल वाहतूक होत असल्याची माहिती मिळाली. कर्मचारी यांनी जागेवर जाऊन पाहणी केली असता सागाचे १८ नग ६ बंड्या व १२ बैल आढळून आले.
घटनास्थळी आरोपी वन कर्मचाऱ्यांना पाहताच जंगलात पळून जाण्यात यशस्वी झाले. त्यानंतर सदर घटनास्थळाची पाहणी करून भारतीय वन अधिनियम १९२७ चे कलम ५२ (१) अन्वये १८ नग सागवन लठ्ठे तसेच बैल व बैल बंडी जप्त करून वनपरिक्षेत्र कार्यालय आसरअली येथे आणले. अज्ञात आरोपीविरोधात अवैध साग वृक्ष तोड व अवैध साग मालाची वाहतूक प्रकरणी वन गुन्हा नोंद करण्यात आला. पुढील तपास क्षेत्र सहाय्यक तागडे करीत आहेत. सदर कारवाई उपवनसंरक्षक सुमित कुमार, सहाय्यक वनसंरक्षक एस. एस .पवार यांच्या मार्गदर्शनाखाली आसरअली परिक्षेत्रातील वनकर्मचारी श्रीकांत नवघरे, सोमनपल्लीचे क्षेत्र सहाय्यक आर.बी. मडावी, तागडे, वनरक्षक राहुल चिचघरे, गजानन सडमेक, प्रमोद कोठारे, अजय इरकिवार, विशाल दडमल, बाबुलू वाघाळे, प्रीतम मडावी , कडम पयले, बिसेन तारम, कैलास उईके, किसन कन्नाके, महेश डूब्बुला व वन मजुरांनी केली.