बोडधा गावातील घटना : निवडणूक भरारी पथकाची कारवाई देसाईगंज : जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणूक आचारसंहितेच्या पार्श्वभूमीवर गठित करण्यात आलेल्या निवडणूक भरारी पथकाने बोडधा येथे संशयास्पदरित्या आढळून आलेल्या वाहनाला थांबवून या वाहनातून ८० हजार रूपये किंमतीचा १० बोरे सुगंधित तंबाखू जप्त केला. सदर कारवाई बुधवारी सायंकाळी ७ वाजताच्या सुमारास करण्यात आली. देसाईगंजचे तहसीलदार बालपांडे यांच्या मार्गदर्शनात निवडणूक आचारसंहिता भरारी पथक प्रमुख नायब तहसीलदार उपेश अंबादे, सहायक पोलीस उपनिरीक्षक सचिन मानकर हे कर्मचाऱ्यांसह बोडधा परिसरात फिरत होते. दरम्यान बोडधा येथे एमएच-५-एएस-६०९ क्रमांकाची लाल रंगाची कार संशयास्पदरित्या आढळून आली. सदर वाहनाला थांबविण्यात आले. या वाहनाची तपासणी केली असता, त्यात ८० हजार रूपये किंमतीचा १० बोरे सुगंधित तंबाखू आढळून आला. सदर सुगंधित तंबाखूची वाहतूक अवैधरित्या राहुल प्रकाश बोकडे (२६) रा. गणेशपूर जि. भंडारा व मोहम्मद फैजल मेमन (१७) रा. वॉर्ड क्र. ५४ जि. रायपूर हे करीत होते. सदर व्यक्तींकडे मालांबाबत भरारी पथकाच्या अधिकाऱ्यांनी चौकशी केली असता सदर सुगंधित तंबाखू भंडारा जिल्ह्याच्या साकोली तालुक्यातील सानगडी येथील अनिल फत्ते मोहम्मद कासमानी यांचेकडून खरेदी करण्यात आला. सदर माल देसाईगंजच्या कन्नमवार वॉर्डातील प्रकाश उदासी यांच्याकडे विक्रीकरिता आणत असल्याचे त्यांनी सांगितले. तंबाखू जप्त करून पुढील कारवाई करावी, असे अन्न सुरक्षा अधिकारी, अन्न व औषध प्रशासन गडचिरोली यांना कळविण्यात आले असल्याची माहिती आहे. (प्रतिनिधी)
८० हजारांचा सुगंधित तंबाखू जप्त
By admin | Published: February 16, 2017 1:54 AM