गडचिराेली : वैनगंगेला आलेल्या पुरामुळे महाराष्ट्र- तेलंगण सीमेवरील कालेश्वरम प्रकल्पातील मेडिगड्डा बॅरेजचे ८१ दरवाजे सोमवारी उघडण्यात आले. पाण्याच्या मोठ्या विसर्गामुळे वैनगंगेच्या पात्रात नजर पोहोचेल तिथपर्यंत पाणीच पाणी पसरल्याचे असे चित्र दिसत होते. मेडिगड्डा बॅरेज हा तेलंगणामधील सर्वात मोठे धरण आहे.
हवामान विभागाने गडचिराेली व चंद्रपूर जिल्ह्यात ११ ते १२ जुलैदरम्यान रेड अलर्ट जाहीर केला आहे. हा अंदाज खरा ठरत रात्रीपासूनच जिल्ह्यात संततधार पाऊस काेसळत हाेता. अगाेदरच ओसंडून वाहणाऱ्या नदीनाल्यांच्या पातळीत पुन्हा वाढ झाली. संजय सराेवर, गाेसेखुर्द प्रकल्पाचे दरवाजे उघडण्यात आले आहेत. त्यामुळे वैनगंगा नदी ओसंडून वाहत आहे. गाेदावरी, प्राणहिता व वर्धा नदीसुद्धा उफाळून वाहत आहे. माेठ्या नद्या उफाळून वाहत असल्याने या नद्यांना लागून असलेल्या लहान नद्या व नाल्यांना दाब निर्माण झाला आहे. परिणामी, काही ठिकाणी पूरजन्य स्थिती निर्माण झाली.