पटसंख्या कमी झाल्याचा बसला फटका : केवळ ८५ पदांना शासनाकडून मान्यता गडचिरोली : जिल्हा परिषदेच्या मार्फतीने जिल्हाभरातील मुख्याध्यापकांच्या समायोजनाची प्रक्रिया जिल्हा परिषदेच्या सभागृहात शुक्रवारी राबविली होती. शाळांची पटसंख्या घसरल्याने जिल्ह्यातील ८१ मुख्याध्यापकांना शिक्षक म्हणून समायोजन करण्यात आले आहे. शिक्षण विभागाच्या नवीन धोरणानुसार मुख्याध्यापकाचे पद भरण्यासाठी त्या शाळेमध्ये किमान १५१ विद्यार्थी असणे आवश्यक आहे. मागील वर्षी १५१ विद्यार्थी संख्या असलेल्या १६६ शाळा होत्या. मात्र सप्टेंबर २०१६ च्या संच मान्यतेनुसार ८१ शाळांमधील विद्यार्थ्यांची पटसंख्या १५१ पेक्षा कमी झाली आहे. त्यामुळे शिक्षण विभागाने ८१ शाळांमधील मुख्याध्यापकांची पदे गोठविली व केवळ ८५ शाळांमध्ये मुख्याध्यापक नेमण्यास मंजुरी दिली. जिल्हा परिषदेच्या सभागृहात शुक्रवारी मुख्याध्यापकांच्या समायोजनाची प्रक्रिया राबविण्यात आली. या दरम्यान सुमारे ८१ मुख्याध्यापकांना प्राथमिक शिक्षक किंवा विषय शिक्षक म्हणून नेमण्यात आले आहे. संबंधित मुख्याध्यापकांना शिक्षक म्हणून नेमण्यात आले असले तरी त्यांना वेतन मात्र मुख्याध्यापकाचेच दिले जाणार आहे. याचा अर्थ संबंधित मुख्याध्यापकाच्या वेतनावर कोणताही परिणाम होणार नाही. १९ व २० मार्चला विषय शिक्षक व पदवीधर शिक्षकांचे समायोजन केले जाणार आहे. (नगर प्रतिनिधी)
८१ मुख्याध्यापक बनले शिक्षक
By admin | Published: March 19, 2017 1:54 AM