निविदा प्रक्रिया सुरू : जानेवारी, फेब्रुवारी महिन्यात होणार कामाला सुरूवातगडचिरोली : गडचिरोली जिल्ह्यातून चार प्रमुख राष्ट्रीय महामार्ग जात असून या राष्ट्रीय महामार्गांची पावसामुळे दुरवस्था झाली. त्यामुळे २०१६-१७ मध्ये ८६.५ किमी रस्ते दुरूस्त करण्याचे नियोजन राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने केले आहे. गडचिरोली जिल्ह्यातील आरमोरी-गडचिरोली, गडचिरोली-सिरोंचा, मूल-धानोरा हे राज्य महामार्ग होते. मात्र मागील वर्षी केंद्र शासनाने या मार्गांचे रूपांतर राष्ट्रीय महामार्गामध्ये केला आहे. त्यामुळे या महामार्गांच्या देखभाल व दुरूस्तीची जबाबदारी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे आली आहे. यावर्षीच्या पावसाळ्यात गडचिरोली जिल्ह्यात सुमारे १३० टक्के पाऊस झाला. संततधार पावसामुळे डांबरी रस्त्यावरील डांबर उखडून गेले. त्यामुळे ठिकठिकाणी मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. रस्ते नुतनीकरणाच्या कामाला जानेवारी, फेब्रुवारी महिन्यापासून सुरूवात होते. तोपर्यंत खड्डे बुजवून मार्ग चालवावा लागतो. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने रस्त्यांवरील खड्डे बुजविण्याच्या कामाला सुरूवात केली आहे. या अंतर्गतच गडचिरोली शहरातील खड्डे बुजविण्यात आले होते. रस्त्यांची प्रचंड प्रमाणात दुरवस्था झाली असल्याने सदर रस्त्यांचे नुतनीकरण करणे आवश्यक होते. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने ८६ किमीच्या रस्त्यांचे नुतनीकरण करण्यासाठीचा प्रस्ताव शासनाकडे सादर केला होता. या प्रस्तावाला मंजुरी प्रदान करण्यात आली आहे. गडचिरोली जिल्ह्यातील एकूण राष्ट्रीय महामार्गांची लांबी ५०० किमीपेक्षा अधिक आहे. यापैकी केवळ ८६.५ किमीचे नुतनीकरण केले जाणार आहे. म्हणजेच उर्वरित मार्गांची स्थिती आहे तशीच राहणार आहे. चार प्रमुख मार्गांचे ११ भागांमध्ये विभाजन करून प्रस्ताव सादर करण्यात आला आहे. निविदा प्रक्रियेची कामे सुरू असल्याने किमान ८६.५ किमी लांबीचे रस्ते दुरूस्त होतील, अशी आशा आहे.६८.९३ कोटींचा निधी मंजूरस्थानिक राष्ट्रीय महामार्ग कार्यालयाने आरमोरी-गडचिरोली दरम्यानचे १० किमी, गडचिरोली-तळोधी दरम्यान १०.५ किमी, आष्टी ते आलापल्ली दरम्यान २२ किमी, तळोधी ते आष्टी दरम्यान १५.५ किमी, आलापल्ली ते सिरोंचा दरम्यान २८.५ किमी रस्तयाच्या नुतनीकरणाचे काम हाती घेतले जाणार आहे. यासाठी एकूण ६८.९३ कोटी रूपयांचा खर्च येणार आहे. दुरूस्तीचे प्रस्ताव कार्यालयाने शासनाकडे सादर केले होते. या प्रस्तावांना मंजुरी प्रदान करण्यात आले. त्याचबरोबर निधी सुध्दा उपलब्ध करून दिला आहे. राष्ट्रीय महामार्गांचे नवीन बांधकाम होईपर्यंत जुन्याच रस्त्यांची डागडुजी करून दुरूस्तीचे काम हाती घेण्यात आले आहे. सदर राष्ट्रीय महामार्ग नवीन बांधण्यास पुढील एक ते दोन वर्ष लागणार आहेत.
८६ किमी राष्ट्रीय मार्गांची होणार दुरूस्ती
By admin | Published: November 07, 2016 1:51 AM