पंकज लायदे
गडचिरोली : सरपंच आणि सचिवांच्या डिजिटल स्वाक्षरीचा गैरवापर करून ग्रामपंचायतींना साहित्याचा पुरवठा करणाऱ्या कंपनीचा मालक व त्याच्या सहकाऱ्याने चक्क ८७ लाख रुपयांचा गैरव्यवहार केल्याचा खळबळजनक प्रकार धारणी पंचायत समितीत उघडकीस आला आहे. संबंधित कंपनीच्या मालकावर दाखविलेला अतिविश्वास आदिवासी भागातील या सरपंच आणि सचिवांच्या चांगलाच अंगलट आला आहे.
धारणी पंचायत समिती अंतर्गत बिजुधावडी, मांगीया, चौराकुंड, काकरमल, घुटी, टिटंबा या सहा ग्रामपंचायतींमध्ये गाव विकासाकरिता पंधराव्या वित्त आयोगाच्या निधीतून साहित्याची खरेदी केली. शासनाने ऑनलाईन देयक अदा करण्याचे सुचविल्याने ते देयक सरपंच आणि सचिवांनी स्वत: डिजिटल स्वाक्षरीचा वापर करून राज इन्फ्राटेकला ती रक्कम अदा करायला हवी होती. मात्र, त्यांनी आपल्या डिजिटल स्वाक्षरीची डीएससी थेट राज इन्फ्राटेकचे मालक अनिल खडसे यांच्याकडे ४ फेब्रुवारी २०२२ रोजी दिली.
त्या डीएससीचा वापर करून अनिल खडसे व त्यांचे सहकारी सिद्धार्थ मनोहरे यांनी राज इन्फ्राटेकच्या खात्यात देयकाची रक्कम अदा करून घेतली. शिवाय दोघांनी संगनमत करून रॉयल ट्रेडर्स, राय ट्रेडर्स, इरा इन्फ्राटेक या नावाने तीन बोगस खाती तयार करून ८७ लाख ५ हजार ५६० रुपये परस्पर काढले. ही बाब १० फेब्रुवारी रोजी काकरमल ग्रामपंचायतचे सचिव ढेंबरे यांना आपल्या ग्रामपंचायतच्या खात्यातून अतिरिक्त रक्कम गेल्याचे लक्षात आले. त्यांनी त्यांच्या इतर सहकारी ग्रामसेवकांना आपले खाते तपासायला सांगितले असता, हा प्रकार घडल्याचे समजले. ग्रामपंचायत सरपंच सचिवांनी लगेच गटविकास अधिकारी महेश पाटील, जिल्हा परिषदेचे सीईओ अविश्यांत पंडा यांच्याकडे धाव घेऊन ही बाब लक्षात आणून दिली. त्यांच्या आदेशानुसार अमरावती ग्रामीणचे पोलीस अधीक्षक अविनाश बारगळ यांच्याशी चर्चा करून सदर गैरव्यवहाराबाबत कळविले.