गडचिरोली : पाटबंधारे (सिंचाई) विभागाच्या अखत्यारित येणाऱ्या शहरातील गोकुलनगरलगतच्या तलावाच्या पात्रात २७ मे रोजी महसूल पाटबंधारे व नगर परिषदेच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या संयुक्त पथकाने सर्वेक्षण केले. या सर्वेक्षणात तब्बल १९ हजार १९७ चौरस मीटर क्षेत्रावर ९६ घरांचे अतिक्रमण असल्याचे सिध्द झाले आहे. या संदर्भातील अहवाल गडचिरोलीच्या तहसीलदारांनी उपविभागीय अधिकारी व जिल्हाधिकाऱ्यांना सादर केला आहे.गडचिरोली साजामधील सर्वे क्रमांक ७५१ मध्ये २८, सर्वे क्रमांक ७७४ मध्ये २१ व रामपूर तुकूम साजामधील सर्वे क्रमांक १४१ मध्ये ४७ अशा एकूण ९६ कुटुंबप्रमुख यांचे तलावाच्या पात्रात अतिक्रमण असल्याचे संयुक्त पथकाने केलेल्या सर्वेक्षणात दिसून आले. सर्वेक्षणानुसार अतिक्रमणात पक्के घर बांधकाम, जोता स्तर व रिकामी जागा तर काही अतिक्रमीत नागरिकांनी कॉलमची उभारणी तसेच काही नागरिकांनी कॉलम उभारण्यासाठी खड्डे तयार केले असल्याचे दिसून आले. गडचिरोली तहसील कार्यालयाच्या वतीने तलाव पात्रात अतिक्रमण केलेल्या कुटुंबप्रमुख यांची यादी तयार करण्यात आली असून सदर यादी व याबाबतचा अहवाल जिल्हाधिकाऱ्यांकडे पुढील कार्यवाहीसाठी सादर करण्यात आला आहे. कर्मचाऱ्यांच्या संयुक्त पथकाने केलेल्या सर्वेक्षणात १० हजार ६६५ चौरस मीटर क्षेत्रावर ४९ तर ८ हजार ५३२ चौरस मीटर क्षेत्रावर ४७ नागरिकांनी अतिक्रमण केल्याचे सर्वेक्षणात आढळून आले. आता तलावाचे सीमांकन करण्यात येणार आहे. (स्थानिक प्रतिनिधी)कारवाई होणार काय?४तलाव पात्रातील अतिक्रमणाच्या सर्वेक्षणाचा अहवाल जिल्हाधिकारी कार्यालयातील जमीन शाखेच्या विभागास प्राप्त झाला आहे, अशी माहिती तेथील एका कर्मचाऱ्याने लोकमतला दिली. या सर्वेक्षणाच्या अहवालावर कोणता निर्णय घेतात, याकडे शहरवासीयांचे लक्ष लागले आहे. सर्वेक्षणानंतर पुढील कारवाई काय, हे जाणून घेण्यासाठी लोकमतने जिल्हाधिकारी ए. एस. आर. नायक यांच्या भ्रमणध्वनीवर तसेच कार्यालयीन दुरवध्वनी संपर्क साधला असता, त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही. तलाव पात्रातील अतिक्रमणधारकांवर कारवाई होणार काय हा प्रश्न सध्या अनुत्तरीत आहे.अतिक्रमणधारकांत बड्यांचा समावेश४सिंचाई विभागाच्या अखत्यारित येत असलेल्या गोकुलनगरलगतच्या तलावाच्या पात्रात केवळ सर्वसामान्य व गरीब नागरिकांनीच अतिक्रमण केले नाही. तर या अतिक्रमणधारकांमध्ये अनेक बड्या कुटुंब प्रमुखांचा समावेश आहे. तलावाच्या पात्रात वन, शिक्षण, आदिवासी विकास विभाग आदींसह विविध विभागात कार्यरत कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. तसेच सुदृढ आर्थिक परिस्थिती असलेल्यांचाही या अतिक्रमणधारकांमध्ये समावेश आहे, असे कर्मचाऱ्यांच्या संयुक्त पथकाने केलेल्या सर्वेक्षणात आढळून आले.४सामाजिक कार्यकर्ते बसंतसिंह बैस यांनी सदर तलावपात्रात मोठ्या प्रमाणात अतिक्रमण केल्यामुळे शेती सिंचन व मासेमारी व्यवसाय धोक्यात आला असल्याची तक्रार जिल्हाधिकाऱ्यांकडे केली होती.
तलावात ९६ घरांचे अतिक्रमण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 06, 2016 2:11 AM