जुने १८४ टॉवर कार्यरत : दुर्गम भागातील गावेही मोबाईल नेटवर्कने जोडणार गडचिरोली : बीएसएनएलच्या फेज-८ अंतर्गत ५० व केंद्र शासनाच्या एलडब्ल्यूई प्रोजेक्ट अंतर्गत ४० असे एकूण ९० नवीन मोबाईल टॉवर गडचिरोली जिल्ह्यात २०१७-१८ या चालू वर्षात उभारले जाणार आहेत. यातील बहुतांश टॉवर ३-जी यंत्रणा असलेले आहेत. दिवसेंदिवस मोबाईलचा वापर वाढत चालला आहे. मोबाईल ही केवळ शोभेची वस्तू राहिली नाही तर प्रत्येक नागरिकाची गरज बनत चालली आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांकडे इतर सोयीसुविधा नसल्या तरी त्याच्याकडे किमान एक मोबाईल आढळून येतो. ग्रामीण भागातही मोबाईलचा वापर वाढला असल्याने मोबाईल कंपन्या ग्रामीण भागात टॉवर उभारून ग्रामीण भागातील ग्राहकाला आपल्याकडे आकर्षित करण्याचा प्रयत्न करीत आहेत. गडचिरोली जिल्ह्यात फारसे उत्पन्न मिळत नाही. त्याचबरोबर नक्षल्यांकडून मोबाईल टॉवर जाळपोळीच्या घटना घडतात व इतरही यंत्रसामग्रची नासधूस नक्षल्यांकडून केली जाते. त्यामुळे खासगी कंपन्या मोबाईल सेवा ग्रामीण व दुर्गम भागात सेवा देण्यास तयार होत नाही. परिणामी केंद्र शासनाची सरकारी कंपनी असलेल्या बीएसएनएललाच गडचिरोली जिल्ह्यातील मोबाईल सेवेचा भार उचलावा लागत आहे. बीएसएनएलने ग्रामीण व दुर्गम भागात टॉवर उभारण्यास प्रथम प्राधान्य दिले आहे. बीएसएनएलचे यापूर्वी गडचिरोली जिल्ह्यात एकूण १८४ टॉवर कार्यरत आहेत. यात आता आणखी ९० टॉवरची भर पडणार आहे. या नवीन टॉवरच्या उभारणीमुळे ग्रामीण व दुर्गम भागातही बीएसएनएलचे कव्हरेज उपलब्ध होणार आहे. तालुकास्तरावर उभारण्यात आलेल्या सर्वच टॉवरला ३-जी यंत्रणा बसविण्यात येणार आहे. राज्य शासनाने २०१६-१७ मध्ये पाच कोटी रूपयांचा निधी उपलब्ध करून दिला होता. त्यातून १७ टॉवर मंजूर करण्यात आले होते. त्यापैकी १४ टॉवरचे काम पूर्ण झाले आहे. अंकिसा, पेंटिपाका व एटापल्ली येथील तीन टॉवर निर्माणधिन आहेत. ८ एप्रिल पूर्वी सदर टॉवरचेही बांधकाम पूर्ण होईल, अशी माहिती बीएसएनएलचे जिल्हा अभियंता इलियासुद्दीन सय्यद यांनी दिली आहे. (नगर प्रतिनिधी) या ५० गावांमध्ये उभारणार मोबाईल टॉवर गडचिरोली शहरातील एसपी आॅफीस, गोकुलनगर, कारगिल चौक, रेडीगोडाऊन, इंदिरानगर वार्डात तसेच सेमाना देव येथे ३-जी यंत्रणा असलेले मोबाईल टॉवर उभारले जाणार आहे. त्याचबरोबर गडचिरोली तालुक्यातीच गोगाव, मारोडा, मुरूमाडी, मौशीखांब, सिरोंचा तालुक्यातील सिरोंचा, कोतागुडम, मुलचेरा तालुक्यातील गोमणी, चामोर्शी तालुक्यातील खुदीरामपल्ली, लक्ष्मणपूर, नेताजी नगर, जयरामपूर, अडपल्ली माल, मार्र्कंडा कं., इल्लूर, मार्र्कंडादेव, धानोरा तालुक्यातील धानोरा, इरूपटोला, अहेरी तालुक्यातील गुड्डीगुडम, प्राणहिता अहेरी कॅम्प, देसाईगंज तालुक्यातील कोंढाळा, सावंगी, पोटगाव, कुरखेडा तालुक्यातील पलसगड, आंधळी, मालेवाडा, वडेगाव, भटेगाव, शिरपूर, घाटी, चांदगड, कोसरी, आरमोरी तालुक्यातील विहिरगाव-कुकडी, आरमोरी तहसील कार्यालय, किटाळी, कोरची तालुक्यातील खोब्रामेंढा, एटापल्ली तालुक्यातील येलचिल, अहेरी तालुक्यातील जाफ्राबाद, खमनचेरू, अहेरी येथील तलवाडा व देवलमारी येथे टॉवर उभारले जाणार आहे.
बीएसएनएल उभारणार ९० टॉवर
By admin | Published: April 01, 2017 1:53 AM