लोकमत न्यूज नेटवर्कगडचिराेली : काेराेना रूग्णांची संख्या वाढत चालली असली तरी बरे हाेणाऱ्या रूग्णांची संख्यासुध्दा वाढत आहे. एकूण रुग्णांपैकी सुमारे ९४ टक्के रूग्ण बरे हाेऊन घरी परतले आहेत. जिल्ह्यात पहिला पॉझिटिव्ह रुग्ण आढळून येण्यास ७ महिने पूर्ण होत आहेत. तेव्हाची आणि आताची परिस्थिती पाहता बराच फरक पडला असून कोरोनाशी जुळवून घेत लोक व्यवहार करू लागले आहेत. मार्च महिन्यापासूनच राज्यभरात काेराेनाचे रूग्ण वाढण्यास सुरूवात झाली हाेती. मात्र राज्यात सर्वात शेवटी म्हणजे १८ मे राेजी काेराेनाचा पहिला रुग्ण आढळला होता. त्यावेळी एकाच वेळी पाच रूग्ण आढळले होते. त्यातील चार रूग्ण कुरखेडा तालुक्यातील व एक रूग्ण चामाेर्शी तालुक्यातील हाेता. जिल्हाधिकाऱ्यांनी काेराेनाचा रूग्ण आढळून आल्याचे जाहीर करताच सामाजिक माध्यमांवर ती बातमी वाऱ्यासारखी पसरली. नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले हाेते. पाॅझिटीव्ह आढळलेले रूग्ण कुरखेडा तालुक्यातील येंगलखेडा व चिचेवाडा येथील असल्याने ही दाेन्ही गावे प्रशासनाने सील केली हाेती. पाॅझिटीव्ह आढळलेले रूग्ण मुंबई येथून परतले हाेते. कुरखेडा येथील एका टॅक्सी चालकाने त्यांना साेडून दिले. ताे टॅक्सी चालक ज्या गांधी वार्डात वास्तव्यास हाेता ताे परिसर १४ दिवसांसाठी प्रतिबंधीत क्षेत्र घाेषित करून सील करण्यात आला. पाेलिसांचा खडापहारा ठेवला हाेता. यावरून प्रशासन व नागरिकांमध्ये काेराेनाची किती दहशत हाेती, याचा अंदाज येतो. आता मात्र काेराेना रूग्णांची संख्या बरीच जास्त आहे. दरदिवशी जवळपास ५० रूग्ण आढळून येतात. तरीही काही नागरिक बिनधास्त फिरतात. यावरून काेराेनाविषयी पूर्वी असलेली भिती कमी झाली असल्याचे दिसून येते. जिल्ह्यातील काेराेना एकूण रूग्णांची संख्या ८ हजार ५०५ वर पाेहाेचली आहे. त्यापैकी ८ हजार २० रूग्ण काेराेनापासून मुक्त हाेऊन घरी परतले असून ते सर्वजण ठणठणीत आहेत.
चार दिवसानंतर आला पाॅझिटीव्ह अहवालसुरूवातीच्या कालावधीत केवळ आरटीपसीआर टेस्ट केल्या जात हाेत्या. या टेस्ट नागपूर येथे पाठविल्या जात हाेत्या. त्यामुळे चार ते पाच दिवस टेस्टचा अहवाल प्राप्त हाेत नव्हता. कुरखेडा येथील रूग्णांचा अहवाल चार दिवसानंतर प्राप्त झाला. अहवाल पाॅझिटीव्ह आल्याचे कळताच रूग्णांमध्ये एकदम भितीचे वातावरण निर्माण झाले.
रूग्ण नसतानाही घेतली जात हाेती काळजी देशभरात लाॅकडाऊन घाेषित झाल्यानंतर जवळपास दाेन महिन्यानंतर जिल्ह्यात पहिलला रूग्ण आढळून आला. ज्यावेळी जिल्ह्यात एकही रूग्ण नव्हता. त्यावेळी आताच्या तुलनेत नागरिक जास्त काळजी घेत हाेते. गर्दीच्या ठिकाणी जाण्यास टाळत हाेते. बाहेर निघताना तर हमखास मास्क घालत हाेते. आता मात्र हे नियम पाळत नसल्याचे दिसून येते.