मनोज ताजने
लोकमत न्यूज नेटवर्क गडचिरोली : महाराष्ट्र, मध्यप्रदेश, छत्तीसगड आणि तेलंगणा या राज्यांच्या सीमावर्ती भागात, अर्थात नक्षलवाद्यांच्या भाषेत ‘दंडकारण्या’त विविध कारणांनी गेल्या वर्षभरात ९६ नक्षलवाद्यांना प्राण गमवावे लागले आहेत. येत्या २८ जुलैपासून सुरू होणाऱ्या नक्षलींच्या शहीद सप्ताहाच्या पार्श्वभूमीवर जारी केलेल्या पत्रकातूनच ही बाब स्पष्ट झाली. विशेष म्हणजे त्यात मोठ्या कॅडरमधील काही नेत्यांचाही समावेश आहे.
जुलै २०२० ते जुलै २०२१ या वर्षभराच्या कालावधीत देशभरात १५० नक्षलवाद्यांनी प्राण गमावले. त्यातील ९६ जण हे दंडकारण्यातील आहेत. त्या ९६ मध्ये २७ महिला नक्षली आहेत. मृत नक्षल नेत्यांमध्ये पवन (एसझेडसीएम), अजित (डीव्हीसीएम), सोमजी (डीव्हीसीएम), रूकनी (महिला डीव्हीसीएम), वर्गेश (डीव्हीसीएम) आणि सतीश (डीव्हीसीएम) आदी वरिष्ठ कॅडरचा समावेश आहे. यातील काही जण पोलिसांशी झालेल्या चकमकीत ठार झाले तर काही कोरोनासह इतर आजारांनी मरण पावले.
महाराष्ट्र पोलीस दलाच्या आक्रमकपणामुळे गेल्या काही वर्षात गडचिरोली आणि गोंदिया जिल्ह्यातील नक्षल कारवाया नियंत्रणात आल्या आहेत. याशिवाय गडचिरोलीत अनेक चकमकींमध्ये नक्षलवादी मारले गेल्याने आत्मसमर्पणाचे प्रमाणही वाढले आहे.
शहीद सप्ताह पाळण्याचे आवाहन
सुरक्षा दलांशी झालेल्या चकमकीत मारल्या जाणाऱ्या नक्षलींच्या स्मृतिप्रित्यर्थ दरवर्षी २८ जुलै ते ३ ऑगस्ट यादरम्यान नक्षल्यांकडून शहीद सप्ताह पाळला जातो. यावर्षीही त्यांनी हा सप्ताह पाळण्याचे आवाहन करणारी पत्रके दुर्गम भागात टाकली आहेत. सोशल मीडियावरूनही ही पत्रके फिरविली जात आहेत. या सप्ताहात मृत नक्षलींच्या स्मृतित शहीद स्मारकांची उभारणी आणि विविध कार्यक्रम राबविणार असल्याचे त्यात म्हटले आहे. दरम्यान नक्षल्यांचे कार्यक्रम यशस्वी होऊ न देण्यासाठी पोलीस विभागही सतर्क झाला आहे.