गडचिराेली : स्वमालकीची गुरे शेतालगतच्या जंगलात चारत असताना अचानक अस्वलाने हल्ला चढवून पशुपालकाला गंभीर जखमी केले. ही घटना सिराेंचा तालुक्याच्या पिरमिडा शेतशिवारातील जंगलात गुरूवारी सायंकाळच्या सुमारास घडली.
देवाजी दुर्गय्या आत्राम (४७) रा. पिरमिडा, ता. सिराेंचा असे गंभीर जखमी असलेल्या गुराख्याचे नाव आहे. देवाजी आत्राम हे नेहमीप्रमाणे गुरूवारीसुद्धा आपल्या मालकीची जनावरे अन्य एका साेबत्याच्या साथीने शेतालगतच्या जंगलात चाराईसाठी घेऊन गेले हाेते. जनावरे चारल्यानंतर सायंकाळच्या सुमारास ते परतीच्या मार्गाला काही वेळेत लागणारच हाेते. अशातच झुडपातून अस्वलाने देवाजी यांच्यावर हल्ला चढविला. त्यांच्या चेहऱ्यावर व अंगावर काही ठिकाणी नखांनी ओरखडे पाडले, तसेच चावाही घेतला. अस्वलाच्या हल्ल्यामुळे ते जिवाच्या आकांताने ओरडू लागले. अशातच यांच्या साेबत व दुसऱ्या दिशेला असलेल्या गुराख्याने धाव घेतली. आरडाओरड केल्यामुळे अस्वल जंगलात पळून गेले. मात्र, ताेपर्यंत देवाजी हे माेठ्या प्रमाणात जखमी झाले. सुरूवातीला त्यांना माेयाबिनपेठा प्राथमिक आराेग्य केंद्रात डाॅ. शिरीष रंगुवार, डाॅ. मेघा जाधव, ज्याेती काेल्हारे, नरेश पांडवला आदींनी उपचार केला. त्यानंतर अहेरी उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी भरती केले.