गडचिरोली : रात्रीच्या अंधारात रस्त्यावर असलेली म्हैस स्पष्ट दिसली नाही. त्यामुळे दुचाकीने म्हशीला जोरदार धडक दिली.यात म्हशीचा जागीच मृत्यू झाला तर दुचाकीस्वार रस्त्याच्या कडेला फेकला गेल्याने तो किरकोळ जखमी झाला. ही घटना कोरची तालुका मुख्यालयापासून सात किलोमीटर अंतरावर असलेल्या सोहले गावापुढील नालापरिसरात घडली.
मुर्रा प्रेमलाल नैताम रा. हित्तापाडी असे जखमी झालेल्या युवकाचे नाव आहे. मुर्रा नैताम हा सीजी ०८ जे ८२९ क्रमांकाच्या दुचाकीने हित्तापाडीवरून खासगी कामानिमित्त कोरचीला येत होता. दरम्यान सोहले गावाच्या नाल्यापुढील रस्त्यावर २ जुलैच्या रात्री ९:१५ वाजता अंधारात म्हैस स्पष्ट दिसून आली नाही. दुचाकीस्वाराने म्हशीला समोरून जोरदार धडक दिली. सदर अपघातात सोहलेचे ग्रामसभा अध्यक्ष जोहारीलाल गंगाकाचूर यांची म्हैस ठार झाली. त्यामुळे त्यांचे ३० ते ३५ हजारांचे नुकसान झाले. हे नुकसान दुचाकीस्वाराकडून सोमवारी भरून घेण्यात आले.
अपघातामुळे रहदारी खोळंबली
कोरची येथील व्यापारी नितीन रहेजा व मितलेश कौशिक चारचाकी वाहनाने कोटरा येथील एका कार्यक्रमासाठी जात होते. दरम्यान त्यांनी हा उपघात पाहिला. यावेळी ट्रक व वाहनांची रांग लागली होती. व्यापारी नितीन व मितलेश यांनी १०८ रुगवाहिकेला फोन केला. परंतु रुग्णवाहिकेला येण्यास उशीर झाल्याने याच मार्गाने कोरचीकडे जाणारे बालक साखरे यांच्या दुचाकीने जखमी युवकाला कोरची रुग्णालयात पाठविले.