गडचिरोली : जिल्ह्यात वाघ आणि बिबट्यांचे हल्ले होण्याचे सत्र सुरूच आहे. गावालगतच्या शेतशिवारात स्वमालकीची गुरे चारत असताना गुराख्यावर वाघाने हल्ला करून त्याला ठार केल्याची घटना घडली आहे. ही घटना जिल्हा मुख्यालयापासून १५ किमी अंतरावरील कळमटोला येथे सोमवारी (२४ ऑक्टोबर) दुपारी ३ वाजताच्या सुमारास घडली. विशेष म्हणजे, तीन महिन्यांपूर्वी मृतकाचा मोठा भाऊसुद्धा व्याघ्रबळी ठरला होता.
प्रभाकर तुकाराम निकुरे (६०) रा. कळमटोला ता. गडचिरोली असे वाघाच्या हल्ल्यात ठार झालेल्या गुराख्याचे नाव आहे. प्रभाकर निकुरे हे सकाळी ११ वाजतानंतर स्वमालकीची गुरे घेऊन अन्य ४ गुराख्यांसोबत गावापासून दोन किमी अंतरावरील शेतशिवारात गेले. ते दररोज दिभना मार्गावरील त्याच भागात गुरे चारायचे. सोमवारी जंगलालगत गुरे चारत असताना प्रभाकर निकुरे हे जंगलाच्या बाजूने उभे होते. याचवेळी वाघाने त्यांच्यावर झडप घेतली व त्यांना फरफटत ६०-७० मीटर अंतरावर नेले. वाघाने हल्ला करताच जवळपास असणाऱ्या गुराख्यांनी आरडाओरड केली ; परंतु वाघाचा प्रतिकार करण्याची कुणाचीच हिंमत झाली नाही. निकुरे यांची मान पकडून वाघ त्यांना सहज उचलून घेऊन गेला, मात्र गुराख्यांच्या ओरडण्यामुळे थोड्याच वेळात त्यांना काही अंतरावर टाकून जंगलात पळून गेला; परंतु तोपर्यंत प्रभाकर निकुरे यांचा जीव गेला होता. सोबतच्या गुराख्यांनी वेळीच याबाबतची माहिती गावात व वनविभागाच्या कर्मचाऱ्यांना दिली. वनाधिकाऱ्यांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला व सायंकाळी मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात पाठविला. जंगलालगत गुरे चारू नये, असे वन विभागाकडून सांगूनही लोक जुमानत नसल्याने, अशा घटना वारंवार घडत आहेत.
कुटुंबावर दुसरा आघात -मृतक प्रभाकर निकुरे यांचे मोठे भाऊ खुशाल निकुरे हेसुद्धा गुरे चारत असतानाच २८ जुलै रोजी म्हणजेच तीन महिन्यांपूर्वी धुंडेशिवणीपासून ३ किमी अंतरावरील पिपरटोल्याच्या जंगलात वाघाच्या हल्ल्यात ठार झाले. प्रभाकर हे कळमटोला तर खुशाल हे धुंडेशिवणी येथे राहत होते. तीन महिन्यात निकुरे कुटुंबावर दुहेरी आघात झाला.