गडचिरोली : कोणत्याही सरकारी कार्यालयांच्या आवारात (कंपाऊंडच्या आत) दारूच्या रिकाम्या बाटल्या असणे, आणि त्या सुद्धा एक-दोन नाही तर अक्षरश: बाटल्यांचा खच पडलेला असणे आश्चर्यात टाकणारे आहे. कळस म्हणजे दारूबंदी असलेल्या गडचिरोली येथील जिल्हा मुख्यालयातील काही सरकारी कार्यालयात हा प्रकार दिसणे धक्कादायक आहे. त्यामुळे हे सरकारी कार्यालयाचे आवार, की दारुड्यांचा अड्डा? असा प्रश्न पडल्याशिवाय राहात नाही.
चार दशकांपूर्वी, म्हणजे १९८२ मध्ये गडचिरोली जिल्ह्याची निर्मिती झाली. त्यानंतर सर्व सरकारी कार्यालयांसाठी कॉम्प्लेक्स भागातील बॅरेक नावाच्या इमारतीत जागा देण्यात आली. आजही बहुतांश कार्यालयांचा कारभार त्याच ठिकाणावरून चालतो. यातील सर्वात शेवटच्या बॅरेकचे आवार म्हणजे दारुड्यांसाठी हक्काचे ठिकाण झाल्याचे दिसून येते. कारण त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर दारूच्या बाटल्यांचा खच पडलेला आहे.
शेवटच्या बॅरेकमध्ये समोरच्या बाजूने भूजल सर्वेक्षण विभाग आणि जिल्हा हिवताप कार्यालय आहे. त्यामागे सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालय, नगर रचना आणि मूल्यनिर्धारण विभाग, तसेच शिक्षण विभागाच्या वेतन पथकाचे कार्यालय आहे. समोरच्या बाजूने असलेल्या झाडाच्या बुंध्याजवळ आणि बाहेरील स्वच्छतागृहासमोर दारूच्या रिकाम्या बाटल्या पडलेल्या आहेत. मागच्या बाजूने तर वेतन पथक कार्यालयाला लागूनच दारूच्या रिकाम्या बाटल्यांचा खच पडलेला आहे.
रात्रीच्या वेळी फाटक उघडे, चौकीदारही नाही
बॅरेकमध्ये अनेक कार्यालये असली तरी सर्व कार्यालये मिळून एकही चौकीदार नाही. बाहेरील फाटकही रात्री बंद नसते. त्यामुळे बाहेरील कोणीही लोक येऊन येथे निवांतपणे बसून दारू पिऊ शकतात. कार्यालयाच्या समोरच्या बाजूने पोलिस मुख्यालयाचे प्रवेशद्वार असले तरी रात्रीच्या वेळी बॅरेकच्या आवारात कोण जातो आणि काय करतो, याच्याशी त्यांचा संबंध नसतो.