कौसर खान
सिरोंचा (गडचिरोली) : १९९५ साली आलेल्या करण- अर्जुन चित्रपटातील 'ये बंधन तो प्यार का बंधन है...' या गीतातून भावंडांच्या प्रेमळ नात्याचे हृदयस्पर्शी वर्णन केलेले आहे. अतिदुर्गम सिरोंचातही बहीण- भावाच्या अतूट नात्याचे हृदयाला भिडणारे उदाहरण समोर आले आहे. येथील मेडिकलचालक श्रीनिवास वेलदंडी यांनी बहिणीला स्वत:ची किडनी देऊन मृत्यूच्या दाढेतून बाहेर काढले. २५ वर्षांपूर्वी किडनी प्रत्यारोपण दुर्मीळ होते; पण श्रीनिवास यांनी स्वत:च्या जिवाची पर्वा न करता बहिणीला जीवदान दिले. रक्षाबंधनानिमित्त बहीण- भावाच्या प्रेमळ अतूट नात्याची ही भावस्पर्शी कहाणी....
सिरोंचा येथील श्रीनिवास वेलदंडी (वय ५५) हे मेडिकल चालवतात. परिवारात पत्नी व दोन मुले आहेत. मोठा मुलगा जर्मनीत एमबीबीएसचे शिक्षण घेत आहे, तर धाकटा हैदराबाद येथे उच्चशिक्षण घेत आहे. त्यांची मोठी बहीण भाग्यलक्ष्मी थौतम (वय ५५) ही वारंगल (तेलंगणा) येथे राहते. २५ वर्षांपूर्वी १९९८ मध्ये अचानक भाग्यलक्ष्मी यांची प्रकृती खालावली, त्यांना तेलंगणातील खासगी दवाखान्यात दाखल केले तेव्हा त्यांची एक किडनी निकामी झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. हे ऐकून कुटुंबीयांच्या पायाखालची जमीनच सरकली. काही सुचत नव्हते, दुसरीकडे भाग्यलक्ष्मी अंथरुणावर होती. रक्ताच्या नात्यातील कोणी किडनी दान केली, तरच तिचे प्राण वाचतील, असे डॉक्टरांनी सुचवले. तेव्हा श्रीनिवास पुढे झाले. सर्व प्रक्रिया पूर्ण करून त्यांनी बहिणीला एक किडनी दिली. त्यानंतर किडनी प्रत्यारोपण यशस्वी झाले. ती आजारातून सुखरूप बाहेर आली.
दोन गूड न्यूज....
२१ जुलै १९९८ रोजी श्रीनिवास यांची किडनी काढून बहिणीवर प्रत्यारोपण शस्त्रक्रिया यशस्वी पार पडली. त्यानंतर २९ जुलै १९९८ रोजी श्रीनिवास यांच्या पत्नीची प्रसूती होऊन मुलगा झाला. एकीकडे बहिणीला जीवदान, तर दुसरीकडे पिता झाल्याने आनंद द्विगुणित झाला, अशी आठवण श्रीनिवास यांनी सांगितली. बहीण-भावाचे नाते श्रेष्ठ आहे. आम्ही दोघेही २५ वर्षांपासून सुरक्षित आहोत. यामुळे बहिणीच्या आजारपणाची लढाई जिंकल्याचा आनंद आहे, असे ते म्हणाले.