कुरखेडा (गडचिरोली) : सासरच्यांकडून छळ असह्य झाल्याने तालुक्यातील खरकाडा येथील विवाहित महिला हर्षदा महेश बंसोड (२३) हिने घरातच गळफास घेऊन आत्महत्या केली. विशेष म्हणजे तिच्या लग्नाला केवळ ११ महिने झाले हाेते. याप्रकरणी तिचे पती, सासू, सासरा व दिराच्या विराेधात कुरखेडा पाेलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पती महेश बाबुराव बंसोड,सासरा बाबुराव ऋषी बंसोड,सासू उषाबाई बाबुराव बंसोड व दीर प्रणय बाबुराव बंसोड अशी अटक झालेल्या आराेपींची नावे आहेत. त्यांच्याविराेधात भारतीय दंड संहिता १८६० चा कलम ३०४ ब, ३०६, ३४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. देसाईगंज तालुक्यातील बोडधा येथील हर्षदा गायकवाड हिचा विवाह मागील वर्षी १९ एप्रिल २०२२ रोजी खरकाडा येथील महेश बंसोड याच्याशी झाला होता. लग्न झाल्यानंतर काही दिवसच हर्षदाला चांगले वागवण्यात आले. त्यानंतर तिचा शारीरिक व मानसिक छळ करण्यास सुरुवात केली. आपला छळ हाेत असल्याने सासरी थांबणे कठीण असल्याची बाब हर्षदाने वडिलांना आदल्या दिवशी फोन करून माहेरी सांगितली. तसेच माहेरी येण्याची इच्छा व्यक्त केली हाेती. तिला माहेरी आणण्यासाठी वडील तयार झाले; मात्र ते तिच्या सासरी पाेहाेचण्यापूर्वीच तिने आत्महत्या केली.
मुलीचे शवविच्छेदन कुरखेडा येथील रुग्णालयात करण्यास वडिलांनी विरोध केल्याने तिचे शवविच्छेदन जिल्हा सामान्य रुग्णालय गडचिरोली येथे करण्यात आले. यानंतर रात्री शव घेऊन कुरखेडा येथील पोलिस स्टेशनला पोहोचले. आपल्या मुलीला शारीरिक व मानसिक त्रास देत आत्महत्येस प्रवृत्त केल्याची तक्रार कुरखेडा पोलिस स्टेशनमध्ये वडिलांनी दाखल केली. त्यानंतर स्वगावी बोळदा येथे पोहोचत रात्रीच हर्षदाच्या मृतदेहावर अंतिम संस्कार करण्यात आले. कुरखेडा पोलिसांनी या प्रकरणात हर्षदाचे पती, सासरा, सासू व दिराच्या विराेधात गुन्हा दाखल करून साेमवारी चाैघांनाही अटक केली. घटनेचा तपास ठाणेदार संदीप पाटील यांच्या मार्गदर्शनात पोलिस उपनिरीक्षक नारायण शिंदे करीत आहेत.
थाेडा संयम बाळगला असता तर वाचले असते प्राण
सासरचे व्यक्ती त्रास देत असल्याचे वडिलांना सांगितल्यानंतर हर्षदाचे वडील तिला घेऊन जाण्यास तयार झाले हाेते; मात्र ते घरी पाेहाेचण्यापूर्वीच तिने घरातच गळफास घेतला. काही वेळ तिने संयम बाळगला असता तर ती माहेरी पाेहाेचली असती व तिचे प्राण वाचले असते.