दिगांबर जवादे लोकमत न्यूज नेटवर्क गडचिरोली : शहरातील कुणाचाही प्लॉट दाखवून त्याचा अगदी स्वस्तात सौदा करून टोकन म्हणून दोन ते तीन लाख रूपये उकळणारी टोळी गडचिरोली शहरात सक्रीय झाली आहे. या टोळीपासून सावध राहण्याची आवश्यकता आहे. काही नागरिकांची अशा पद्धतीने फसवणूक झाली आहे.
जिल्हास्थळ असलेल्या गडचिरोली शहराची लोकसंख्या अतिशय झपाट्याने वाढत आहे. शहराच्या एका बाजूला कठाणी नदी, दोन्ही बाजूला जंगल असल्याने विस्तारासाठी फारशी जागा शिल्लक नाही. त्यामुळे खरेदीदारांच्या तुलनेत प्लॉटची संख्या कमी असल्याचे दिसून येत आहे. एखाद्या जागेवर चुना टाकून आखणी झाल्याच्या काही दिवसातच प्लॉट विकले जातात. शहराच्या मध्यभागी असलेली जागा व्यावसायिक कामासाठी खरेदी केली जाते. या प्लॉटचे दर तर अधिक आहेत. काही जाणांनी अनेक वर्षांपूर्वी गुंतवणूक म्हणून सदर प्लॉट खरेदी केले आहेत. काही प्लॉटधारक दुसऱ्या शहरात राहतात. याचा गैरफायदा काही लोकांनी घेण्यास सुरुवात केली आहे. एखादा प्लॉट दाखवून तो विकायचा आहे, असे सांगीतले जाते. एखाद्याला बनावट प्लॉटमालक बनवून सौदा केला जातो. दरम्यान, आतापर्यंत पोलिसांत तक्रार आलेली नाही. मात्र, अनोळखींशी व्यवहार करताना काळजी घेणे गरजेचे आहे.
'प्राईम लोकेशन'वरील प्लॉट दाखवून सौदा काही नागरिकांनी केवळ गुंतवणूक म्हणून प्लॉट खरेदी करून ठेवले आहेत. आता या प्लॉटच्या चारही बाजूला वस्ती झाली आहे. त्यामुळे एखादाच प्लॉट शिल्लक आहे. बरेचसे प्लॉट मालक गडचिरोलीत राहत नाही. त्यामुळे एजंटने जरी प्लॉट दाखवला तरी कोणाचाही आक्षेप राहत नाही.
स्वस्तात मस्तला बळी पडतात ग्राहक प्लॉटधारकाला अडचण आहे, असे भासवले जाते. सदर प्लॉट चार ते पाच जण खरेदी करण्यासाठी इच्छुक आहेत. त्यामुळे इसार म्हणून काही पैसे लवकर द्यायला सांगितले जाते. प्लॉट स्वस्तात मिळत असल्याच्या आमिशाला खेरेदीदार बळी पडतात. इसार म्हणून एक ते दोन लाख रूपये देतात. पैसे देणारा जेव्हा प्लॉटच्या कागदपत्रांची मागणी करतो. तेव्हा आपण फसवल्या गेलो असल्याचे दिसून येते.
अनेकांचे व्यवहार फसले, काळजी घ्या
- अशा प्रकरणांमध्ये काही लोकांची फसवणूक झाली आहे. मात्र अजूनपर्यंत पोलिस स्टेशनला तक्रार प्राप्त झाली नाही. नागरिकांनी अनोळखी व्यक्तींसोबत व्यवहार करून नये.
- इसार देण्यापूर्वी प्लॉटच्या कागदपत्रांची पडताळणी करणे हिताचे आहे. प्लॉट खरेदी विक्रीतून फसवणुकीचा आठ महिन्यांपूर्वी एक गुन्हा नोंद झालेला आहे. याची व्याप्ती कोट्यवधींच्या घरात होती.