गडचिराेली : जिल्ह्यात अद्यापही पाऊस जाेरदार बरसला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना राेवणीची कामे करता आली नाही. सिंचनाची साेय असलेले शेतकरी राेवणीची कामे जाेमात करीत आहेत; परंतु काेरडवाहू शेतकऱ्यांना अद्याप जाेरदार पावसाची प्रतीक्षा आहे.
जिल्ह्यात आवत्याची धान लागवड पूर्ण झाली असली तरी धान राेवणीची कामे शिल्लक आहेत. मात्र, १२ जुलैपर्यंत कृषी विभागाच्या नाेंदीत जिल्ह्यात केवळ ११.२३ टक्केच पेरणी दाखविली आहे. जिल्ह्यात धान, कापूस, साेयाबीन, तीळ, मका, तूर आदी पिके खरीप हंगामात घेतली जातात. सर्वाधिक क्षेत्र धान पीक लागवडीखाली आहे. यावर्षी सुद्धा धान पिकाची लागवड सर्वाधिक हाेईल, असे कृषी विभागाचे नियाेजन हाेते. त्यानंतर कापूस पिकाचा क्रमांक लागताे. यावर्षी अद्याप जाेरदार पाऊस बरसला नाही. तुरळक पावसाच्या भरवशावरच शेतकऱ्यांनी पेरणी केली. सिंचनाची साेय असलेल्या शेतकऱ्यांनी धानाची पेरणी केली. काही शेतकऱ्यांनी धूळ पेरणी केली तर काहींनी तुरळक पाऊस पडल्यानंतर पेरणी केली.
सर्वात कमी पेरणी एटापल्लीत
जिल्ह्यात आतापर्यंत सर्वात कमी पेरणी एटापल्ली तालुक्यात झाली आहे. येथे ०.३४ टक्केच पेरणी झाली. त्यानंतर भामरागड तालुक्यात १.४५ टक्के, अहेरी तालुक्यात १.५३ टक्के तर सिराेंचा तालुक्यात ५.९० टक्केच पेरणी झाली. ही स्थिती कृषी विभागाच्या साप्ताहिक अहवालात दर्शवली आहे.
गडचिराेली तालुका आघाडीवर
जिल्ह्यात २० टक्क्यांहून अधिक एकाच गडचिराेली तालुक्यात खरीप पीक पेरणी झाली. येथे पीक पेरणीचे प्रमाण ३६.१२ टक्के आहे. त्यानंतर सर्वच ११ तालुके २० टक्क्यांच्या खाली आहेत. त्यामुळे ह्या तालुक्यातील पीक पेरणी केव्हा पूर्ण हाेईल, असा प्रश्न आहे.
राेवणीनंतर हाेईल काय उद्दिष्ट साध्य ?
जिल्ह्यात सध्या कापूस, साेयाबिन, तूर, तीळ, मका आदी पिकांची पेरणी झाली आहे. केवळ धान पिकाची पेरणी हाेणे शिल्लक आहे. काही शेतकऱ्यांनी धूळ पेरणी केली. तर काही शेतकऱ्यांनी तुरळक पावसानंतर पेरणी केली. ज्या काेरडवाहू शेतकऱ्यांनी धान पऱ्हे बांध्यांमध्ये टाकले हाेते. त्या शेतकऱ्यांची राेवणी शिल्लक आहे. पुरेसा पाऊस पडल्यानंतरच ही राेवणी हाेईल. त्यामुळे राेवणीनंतर पेरणीचे उद्दिष्ट साध्य हाेईल.