लोकमत न्यूज नेटवर्क कोरचीः तालुका मुख्यालयापासून १५ किलोमीटर अंतरावरील अतिदुर्गम आंबेखारी जंगल परिसरात झाडूचे गवत तोडण्यासाठी गेलेल्या महिलेला अर्धवट पुरलेला मानवी सांगाडा आढळून आला. ही घटना २९ नोव्हेंबरला घडली. तथापि, ज्या महिलेला हा सांगाडा आढळला तिचा मुलगा पाच महिन्यांपासून बेपत्ता आहे. त्यामुळे हा सांगाडा त्याचा असल्याचा संशय तिने व्यक्त केला आहे. यामुळे खळबळ उडाली असून पोलिसांनी सांगाडा ताब्यात घेऊन चौकशी सुरु केली आहे.
आंबेखारी गावातील महेश कडयामी (२२) हा जुलै महिन्यामध्ये मायालघाट येथे अक्षय मडावी सोबत मासेमारीसाठी गेला होता. त्या दिवसापासून तो बेपत्ता आहे. त्याची आई दुलमाबाई कडयामी (५०) या गावाजवळील जंगलात झाडू बनविण्यासाठी सिंधीच्या पाने तोडण्यासाठी गेल्या होत्या. तेव्हा त्यांना अर्धवट जमिनीत पुरून ठेवलेला सांगाडा आढळला, तिला हा महेशचा सांगाडा असावा असा संशय आहे. कोरची पोलिसांना याबाबत माहिती दिली असून तहसीलदार प्रशांत गड्डम यांच्या उपस्थितीत पोलिस निरीक्षक शैलेंद्र ठाकरे यांनी हा सांगाडा ताब्यात घेतला.
यावेळी उपनिरीक्षक प्रवीण बुंदे, वैद्यकीय अधिकारी डॉ. श्रेया बुद्धे व स्थानिक नागरिक उपस्थित होते. दरम्यान, पंचनामा करुन आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली.
डीएनए चाचणी करणारसांगाड्याच्या हाडाचे नमुने डीएनए तपासणी करिता ताब्यात घेतले असून ते तपासणीसाठी पाठविण्यात येणार आहेत. त्यानंतर हा सांगाडा नेमका कोणाचा हे समोर येणार आहे. सर्व शक्यता पडताळून तपास केला जाईल, असे पो.नि. शैलेंद्र ठाकरे यांनी सांगितले.