गडचिराेली : हाेळी दहनाचा सण रविवारी सकाळपासून जाे-ताे उत्साहात साजरा करत असतानाच अहेरी तालुक्याच्या कमलापूर हत्ती कॅम्पमध्ये सकाळी १० वाजता किंकाळी ऐकू आली. येथील १६ वर्षीय राणी हत्तीणीने गाेंडस मादी पिलाला जन्म दिला. या नव्या पाहुण्याच्या आगमनाने कॅम्पसह पशुप्रेमींमधील आनंद द्विगुणित झाला.
राज्यातील एकमेव शासकीय हत्ती कॅम्पमध्ये राणी हत्तीणीला सकाळपासूनच प्रसूतीकळा सुरू झाल्या हाेत्या. त्यामुळे कमलापूर वनपरिक्षेत्रातील अधिकारी तसेच पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांना लगबग लागली. पशुवैद्यकीय अधिकारी डाॅ. महेश येमसे यांनी राणीची प्रसूती सुरक्षितरित्या केली. दरम्यान सिराेंचाच्या उपवनसंरक्षक पूनम पाटे यांनी हत्ती कॅम्पला भेट देऊन पाहणी केली तसेच नवीन मादी पाहुणीची याेग्य काळजी घेण्याबाबत निर्देश दिले. याप्रसंगी कमलापूरचे वनपरिक्षेत्र अधिकारी नरेश चौके उपस्थित हाेते. नव्या पाहुणीच्या आगमनाच्या गुड न्यूजची चित्रफित साेशल मीडियावर व्हायरल झाली.हत्तींची संख्या झाली नऊकमलापूर हत्ती कॅम्पमध्ये राणी, रुपा, प्रियंका, मंगला, बसंती, गणेश, अजित, लक्ष्मी आदी हत्ती आहेत. रविवारी नव्या मादी पाहुणीचे आगमन झाल्याने आता एकूण हत्तींची संख्या नऊ झाली आहे. नव्या पाहुणीचे नामकरण काही दिवसातच हाेणार आहे.