एटापल्ली (गडचिरोली) : एटापल्ली पोलीस स्टेशनमध्ये कार्यरत दोन पोलीस शिपायांमध्ये सुट्यांवरून झालेल्या वादावादीत एकाने दुसऱ्या वरिष्ठ कर्मचाऱ्यावर रागाच्या भरात बंदुकीतून गोळी झाडली. यामुळे गंभीर जखमी झालेल्या पोलीस कर्मचाऱ्याला हेलिकॉप्टरने नागपूरला हलविण्यात आले. विजय करमे (४० वर्षे) असे जखमी कर्मचाऱ्याचे, तर संतोष सिडाम (३२ वर्षे) असे गोळी चालविणाऱ्या कर्मचाऱ्याचे नाव आहे.
विजय करमे हे शीघ्र कृती पथकाचे कमांडर म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सोमवारी सकाळीच त्यांच्या नेतृत्वात काही पोलीस कर्मचारी रस्त्याने बॉम्ब तपासणी करत जात होते. तत्पूर्वी करमे आणि सिडाम यांच्यात सुट्या देण्यावरून वाद झाला होता. हे पथक काही अंतरावर गेले असताना पोलीस शिपाई सिडाम याने आपल्याजवळील बंदुकीतून करमे यांच्यावर पाठीमागून गोळी झाडली. ती करमे यांच्या पाठीतून आरपार गेली.
या घटनेनंतर गडचिरोलीवरून तातडीने पोलीस दलाचे हेलिकॉप्टर बोलवून गंभीर जखमी करमे यांना नागपूरला उपचारासाठी हलविण्यात आले. त्यांची प्रकृती गंभीर पण स्थिर असून उपचार सुरू असल्याचे पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.