भामरागड/सिरोंचा : अतिदुर्गम भामरागड तालुक्यातील जंगलखोऱ्यात आरोग्यसेवा मुबलक प्रमाणात पोहोचलेल्या नाहीत. रुग्णवाहिकाही जात नाहीत अशा एका गावात आरोग्य सेविकेने तत्परता दाखवली, त्यामुळे गरोदर महिलेची प्रसूती सुखरूप झाली. प्रसववेदना झाल्यावर या महिलेला खाटेची कावड करून तब्बल दीड किलोमीटर पायपीट करत दवाखान्यात नेले. बाळ व बाळंतीण सुखरूप आहेत. १६ जुलै रोजी ही माता सुखरूप घरी परतली.
राजे अजय गावडे (२२,रा.चिन्ना कोरली, ता.अहरी), असे त्या महिलेचे नाव आहे. ताडगाव (ता.भामरागड ) हे तिचे माहेर आहे. प्रसूतीसाठी ती माहेरी होती. १४ जुलै रोजी शेतात असताना तिला अचानक प्रसववेदना सुरू झाल्या. तेथून कसेबसे घर जवळ केले. या गावात प्राथमिक आरोग्य केंद्र आहे, पण घर ते आरोग्य केंद्र हे डोंगरदऱ्यातील दीड किलोमीटर अंतर पार करणे मोठे कठीण. वाहन येत नसल्याने काय करावे, हा प्रश्न होता. प्राथमिक आरोग्य केंद्रात कार्यरत कंत्राटी आरोग्य सेविका सपना भुरसे यांनी विनाविलंब जंगलक्षेत्रात धाव घेतली. आरोग्य तपासणी करून धीर दिला. त्यानंतर शक्कल लढवत नातेवाइकांच्या मदतीने खाटेला दोन्ही बाजूंनी बांबूचे लाकूड बांधून राजे गावडे हिला दवाखान्यात नेले.
शेतातून दुचाकी चालवणेही कठीण असताना नातेवाइकांनी दीड किलोमीटर पायपीट केली. वैद्यकीय अधिकारी डॉ. बी. एम. सातमवाड व चमूने सुखरूप प्रसूती केली. १४ जुलै रोजी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास तिची सुखरूप प्रसूती झाली असून, मुलगी जन्मली. माता आणि बाळ दोघेही सुखरूप असून त्यांना १७ रोजी घरी सोडण्यात आले.
शेतात काम करताना प्रसववेदना
दरम्यान, राजे गावडे ही महिला माहेरी शेतात काम करत होती. तेव्हा तिला प्रसववेदना जाणवल्या. आरोग्यसेविका सपना भुरसे यांनी तत्परता दाखवत तिला नातेवाइकांच्या मदतीने दवाखान्यात नेले. त्यामुळे प्रसूती सुखरूप झाली. माता व बाळ दोघेही स्वस्थ असून त्यांना १७ जुलै रोजी घरी सोडण्यात आले. आरोग्यसेविका सपना भुरसे यांचे आभार मानण्यास गावडे कुटुंबीय विसरले नाही.