लाेकमत न्यूज नेटवर्कगडचिराेली : सिराेंचा तालुक्यातून वाहणाऱ्या गाेदावरी नदीला महापूर आला आहे. गाेदावरी नदीपात्रातील कालेश्वरम या ठिकाणी असलेल्या सरिता मापन केंद्रावर १९८६ मध्ये १०७.०५ मीटर एवढी महत्तम पाणी पातळीची नाेंद झाली हाेती. मात्र १७ जुलै राेजी ही मर्यादा ओलांडत या ठिकाणी १०८.१८ मीटर पाणी पातळीची नाेंद झाली. मात्र काही वेळातच पाणी पातळी कमी हाेऊन रविवारी सकाळी ११ वाजता ती १०३ मीटरवर पाेहाेचली. मागील आठ दिवसांपासून जिल्ह्यात मुसळधार पाऊस काेसळत आहे. त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. १५ व १६ जुलै राेजी पावसाचे प्रमाण कमी झाले हाेते. मात्र पुन्हा १७ जुलैपासून जिल्हाभरात मुसळधार पाऊस काेसळत आहे. वैनगंगा व तिच्या उपनद्यांची पाणी पातळी कमी झाली असल्याने पूर परिस्थिती ओसरली असली तरी दक्षिणेकडील गाेदावरी नदीला पूर आला आहे. प्राणहिता नदी ओसंडून वाहत आहे. सिराेंचा तालुक्यात अनेक गावांमध्ये पाणी शिरले आहे.
भामरागडात शिरले पर्लकाेटाच्या पुराचे पाणी पर्लकाेटा नदीच्या पाण्याची पातळी पुन्हा वाढल्याने पर्लकाेटा नदीचे पाणी भामरागड शहरात शिरले आहे. शेकडाे घरे पुन्हा पाण्याखाली आली आहेत. पर्लकाेटा नदीपुलावरून पाणी वाहत असल्याने भामरागड तालुक्याचा संपर्क तुटला आहे. सततच्या पुरामुळे या तालुक्यातील जनजीवन विस्कळीत झाले आहे.
सिराेंचाला पुराचा विळखा कायममागील तीन दिवसांपासून गाेदावरी, प्राणहिता नद्यांना पूर आला आहे. याचा फटका सिराेंचा तालुक्यातील गावांना बसला आहे. अहेरी तालुक्यातील गाेलाकर्जी, नागेपल्ली, प्रभूसदन, सिराेंचा तालुक्यातील सिराेंचा माल, सिराेंचा रै, रामकृष्णापूर, आयपेठा, तुमनूर माल, वडधम, आसरअल्ली, अंकिसा येथील कुटुंबांना सुरक्षितस्थळी हलविण्यात आले हाेते. ही कुटुंबे अजूनही सुरक्षित स्थळीच आहेत.
संजय सराेवर व गाेसेखुर्दमुळे वैनगंगा फुगली- मध्यप्रदेशातील संजय सराेवराचे सर्वच १० दरवाजे उघडले आहेत. तसेच गाेसेखुर्द धरणाचे ३३ पैकी २७ दरवाजे अर्ध्या मीटरने उघडले आहेत. या धरणातून १.०६ लक्ष क्युसेस पाण्याचा विसर्ग सुरू आहे. - नदीकाठी असलेल्या गावातील नागरिकांनी दक्षता घ्यावी, असा इशारा देण्यात आला आहे.
जिल्ह्यातील १५ पेक्षा अधिक मार्ग रविवारीही हाेते बंद
चामाेर्शी ते गडचिराेली मार्गावरील शिवणी नाल्यावर पाणी असल्याने हा मार्ग बंद आहे. अहेरी-बेजूरपल्ली-पर्सेवाडा येथील पाेचमार्ग वाहून गेल्याने हा मार्ग बंद आहे. आलापल्ली ते भामरागड राष्ट्रीय महामार्गावर तुमरगुडा नाल्यावरून पाणी वाहत आहे. आलापल्ली-सिराेंचा मार्ग हलक्या वाहनांकरीता सुरू आहे. बाेमरपल्ली ते नेमडा मार्गावरील रपटे वाहून गेल्याने हा मार्ग बंद आहे. सिराेंचा तालुक्यातील झेंडा, दर्सेवाडा, बाेंड्रा, माेयाबिनपेठा, विठ्ठलराव पेठा, पर्सेवाडा, विठ्ठलराव चेक, सिकेला, रेगुंठा, टेकडा हे मार्ग बंद आहेत. पर्सेवाडा, चिकेला- जाफ्राबाद या मार्गावरील रपटा वाहून गेला आहे. देवलमरी-अहेरी मार्गावरील नाल्यावर पाणी साचले आहे. उमानूर-मरपल्ली मार्गावरील ॲप्राेच रस्ता वाहून गेल्याने हा मार्ग बंद आहे. भामरागड-लाहेरी- बिनागुंडा हा मार्ग बंद आहे. आलापल्ली-आष्टीदरम्यानच्या दिना नदीपुलावरून पाणी वाहत आहे. निजामाबाद-सिराेंचा-जगदलपूर ह राष्ट्रीय महामार्ग साेमनपल्ली जवळच्या पाेचमार्गावरून पाणी वाहत असल्याने बंद आहे. सिराेंचा नगरम मार्ग बंद आहे. सिराेंचा-कालेश्वर, झिंगानूर-सिरकाेंडा मार्ग बंद आहे. आष्टी ते चंद्रपूर मार्गावरील आष्टी पुलावरील पाणी ओसरले आहे. मात्र रस्ता क्षतिग्रस्त असल्याने जड वाहनांकरिता बंद आहे.