गडचिरोली : स्वत:च्या शेतात गुरांसाठी गवत कापत असताना टी-१४ वाघिणीने हल्ला करून महिलेला जंगलात फरफट नेत ठार केले. ही घटना देसाईगंज तालुक्यातील फरी (झरी) येथे सोमवार ११ सप्टेंबर रोजी सकाळी १० वाजता घडली.
महानंदा दिनेश मोहुर्ले (५०) रा. फरी ता. देसाईगंज असे वाघिणीच्या हल्ल्यात ठार झालेल्या महिलेचे नाव आहे. महानंदा मोहुर्ले ही महिला सकाळी ९:३० वाजता घरून आपल्या शेतावर गुरांसाठी गवत कापण्यासाठी निघाली. याचवेळी त्यांच्या पतीने ‘तू पुढे जात राहा, मी येतो’ असे सांगितले. तेव्हा महानंदा ही एका दाम्पत्याच्या दुचाकीवर बसून गावापासून एक किमी अतंरावर असलेले आपले शेत गाठले. तेथे तिघेही गवत कापायला लागले. मोहुर्ले यांची शेती झुडपी जंगलाला अगदी लागून आहे.
महानंदा ही जंगलालगतच्या धुऱ्यावर गवत कापण्यात व्यस्त असतानाच झुडपातून टी-१४ वाघिणीने तिच्यावर हल्ला केला. परंतु याचा सुगावा दुसऱ्या बांधीत असलेल्या जोडप्याला आला नाही. काही वेळातच महानंदा यांचे पती दिनेश हे शेतात पोहोचले. मात्र त्यांना महानंदा दिसली नाही. त्यांनी गवत कापलेल्या भागात पाहिले असता वाघिणीच्या पाऊलखुणा दिसून आल्या. त्यांनी याचवेळी त्या भागात शोधले असता काही ठिकाणी रक्त सांडलेले दिसून आले. पुढे महानंदा यांचा मृतदेह दिसून आला. वाघिणीने महानंदा यांना ५० मीटर अंतरावर फरफटत जंगलात नेले होते. महानंदा यांच्या पश्चात पती, तसेच विवाहित दोन मुले, सुना व नातवंड आहेत.