गडचिराेली : मळणीनंतर शेतातील धानाच्या खळ्यावरचे धान जमा करताना वाघाच्या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या महिलेचा अखेर पाचव्या दिवशी (शुक्रवार, ९) नागपूरच्या रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. गंभीर जखमी अवस्थेत जगण्यासाठी संघर्ष करणाऱ्या ‘त्या’ महिलेची मृत्यूशी अखेर झुंज संपली.
साेनम जितेंद्र उंदीरवाडे (२५) रा. आंबेशिवणी टाेली, असे उपचारादरम्यान मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे. रविवार ४ डिसेंबर राेजी शेतातील खळ्यावरचे धान जमा करीत असताना साेनम यांच्यावर वाघाने हल्ला केला हाेता. पुतण्याच्या सतर्कतेने वेळीच आरडाओरड केल्याने वाघाने घटनास्थळावरू जंगलात पळ काढला हाेता.
साेनम यांना प्रथम जिल्हा सामान्य रुग्णालयात घटनेच्या दिवशी भरती केले; परंतु त्यांची प्रकृती अधिकच खालावल्याने साेमवार ५ डिसेंबर राेजी सायंकाळी नागपूरला उपचारासाठी रेफर केले. येथेच त्यांच्यावर उपचार सुरू हाेते. नागपुरात उपचार घेत असतानाच त्यांची प्रकृती आणखी खालावत गेली अखेर शुक्रवार ९ डिसेंबर राेजी सकाळी ७ वाजता त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
टी-६ वाघिणीचा आठवा बळी-
गडचिराेली तालुक्याच्या दिभना, जेप्रा, राजगाटा, कळमटाेला, धुंडेशिवणी व चुरचुरा जंगल परिसरात गेल्या सहा महिन्यापासून दहशत माजविणाऱ्या टी-६ वाघिणीने ७ लाेकांचा बळी घेतला हाेता. आंबेशिवणी टाेली येथील घटनेनंतर बळींची संख्या आता आठ झाली. बळी गेलेल्यांमध्ये तीन महिला व पाच पुरुषांचा समावेश आहे. यामध्ये कळमटाेला येथील २, तर धुंडेशिवणी, चुरचुरा, अमिर्झा, राजगाटा चक, दिभना व आंबेशिवणी येथील प्रत्येकी एका व्यक्तीचा समावेश आहे.