सिरोंचा : तालुक्यातील टेकडा ताल्ला येथील एका तरुण शेतकऱ्याने आत्महत्या केल्याची घटना ६ ऑक्टोबरला घडली. नापिकीमुळे त्याने आत्महत्या केल्याचे समोर आले आहे दरम्यान, त्याच्या लग्नासाठी मुलीचा शोध सुरू असतानाच त्याने मरण जवळ केल्याने कुटुंब शोकमग्न झाले आहे.
नागेश मल्लय्या दुर्गम (वय २१, रा. टेकडा ताल्ला), असे मयत शेतकऱ्याचे नाव आहे. नागेश हा शेती व्यवसाय करतो. यंदा त्याने शेतात मिरचीची लागवड केली होती; परंतु अतिवृष्टीमुळे दोन एकरांवरील पीक नष्ट झाले. त्यानंतर न खचता त्याने पुन्हा व्याजाने पैसे घेऊन मिरचीची रोपे आणून लागवड केली. पीक जोमात असतानाच किडीचा प्रादुर्भाव झाला. त्यामुळे संपूर्ण पीक वाया गेले. त्यामुळे तो निराश होता. फवारणी करूनही पिकामध्ये सुधारणा न दिसल्याने हतबल झालेल्या नागेशने दुपारी ४ वाजता घरी गळफास घेऊन आत्महत्या केली
त्याच्या वडिलांचे वर्षभरापूर्वी निधन झाले होते. त्याला दोन भाऊ असून, ते स्वतंत्र राहतात, तर तीन बहिणींचा विवाह होऊन त्या सासरी नांदत आहेत.. नागेश आईसह राहत होता. नागेशचे दिवाळीनंतर लग्न करायचे होते, त्यासाठी वधूशोधमोहीम सुरू होती. अशातच त्याने आत्महत्या केल्याने कुटुंबाला धक्का बसला आहे.
धीर दिला; पण......
मिरचीचे पीक दोनदा वाया गेल्यावर आई, कसे करायचे, काय करायचे, असे प्रश्न तो विचारत असे. त्यावर मी त्यास खचून जाऊ नको, आपण दुसरे पीक घेऊ, असे म्हणत धीर देण्याचा प्रयत्न केला होता, अशा शब्दांत त्याची आई पोसक्का मलय्या दुर्गम यांनी आपल्या अश्रूंना वाट मोकळी करून दिली. 'फवारणीसाठी शेतातील विहिरीत पाणी आहे का पाहण्यासाठी मला पाठवले व घरी त्याने असे केले', असे म्हणत त्यांनी हंबरडा फोडला