कोरची (गडचिरोली) : तालुका मुख्यालयापासून आठ किलोमीटर अंतरावर असलेल्या टेमली गावातील एका युवकाने गावातीलच एका १७ वर्षीय मुलीच्या मानेवर चाकूने सपासप वार करून तिला जीवे मारण्याचा प्रयत्न केला. ती रक्ताच्या थारोळ्यात पडल्यानंतर ती मरण पावल्याचे समजून हल्लेखोर युवकाने मध्यरात्री गावाशेजारील आंब्याच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे बुधवारी सकाळी उघडकीस आले. हा थरार मंगळवारच्या रात्री १० वाजतादरम्यान टेमली गावात घडला.
मृत हल्लेखोर युवकाचे नाव विक्रम ग्यानसिंग फुलकवर (२० वर्षे, रा. टेमली) असे आहे. तो शिक्षण सोडल्यानंतर घरीच राहत होता. बेरोजगार असल्याने मजुरीचे काम करण्यासाठी गेल्या मार्च महिन्यात तो गडचांदूर (जिल्हा चंद्रपूर) येथे गेला होता. थोडेफार पैसे कमवून ३० जुलैला तो टेमलीला घरी आला होता. मंगळवारी रात्री ९ वाजताच्या सुमारास घरातील सदस्यांसोबत जेवण करून तो घराबाहेर निघून गेला. त्यानंतर गावातील एका १७ वर्षीय मुलीवर तिच्या घरातील अंगणातच त्याने मानेवर चाकूने सपासप १२ ते १३ वार केले आणि नंतर तेथून पळून गेला.
बहिणीने केला वाचविण्याचा प्रयत्न
हा हल्ला झाला त्यावेळी मुलीची बहीण सोबत होती. तिने मध्ये पडून बहिणीला सोडविण्याचा प्रयत्न केला. पण, तिच्यावरही चाकूने वार करून विक्रम पसार झाला. आरडाओरडा ऐकून घरातील लोकांनी धाव घेऊन त्या दोघींना कोरची ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. डॉ. राहुल राऊत यांनी प्राथमिक उपचार करून गंभीर जखमी असलेल्या मुलीला गडचिरोली जिल्हा रुग्णालयात रेफर केले. मात्र तिची प्रकृती आता धोक्याबाहेर असल्याचे सांगितले जाते.
प्रेम प्रकरणातून वाद?
विक्रमने त्या अल्पवयीन मुलीवर जीवघेणा हल्ला का केला हे अद्याप स्पष्ट झाले नसल्याचे पोलिसांनी सांगितले. मात्र मृतक विक्रम ग्यानसिंग फुलकवर आणि त्या अल्पवयीन युवतीचे अनेक दिवसांपासून प्रेमसंबंध होते. विक्रम गडचांदूरवरून आल्यानंतर ती आपल्याला टाळत तर नाही ना, असा संशय त्याला आला आणि यातूनच त्यांच्यात वाद झाल्याची चर्चा आहे. याच रागातून विक्रमने तिला संपविण्याचा प्रयत्न करून स्वत:लाही संपविले.
झाडावर घेतला गळफास
घटनास्थळावरून पसार झालेल्या विक्रमची रात्री उशिरापर्यंत सर्वत्र शोधाशोध सुरू होती. परंतु तो कुठेच सापडला नाही. सकाळी गळफास घेतलेल्या अवस्थेत त्याचा मृतदेह झाडाला लटकलेल्या अवस्थेत गावकऱ्यांना दिसला. बेळगाव पोलिसांनी मर्ग दाखल केला. या प्रकरणाचा अधिक तपास बेळगाव पोलीस मदत केंद्राचे प्रभारी अधिकारी अनिल नानेकर यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार कुंभारे करीत आहेत.