धानोरा : पोलीस मदत केंद्र सावरगाव येथे प्रभारी पोलीस अधिकारी बालाजी जोनापल्ले यांच्या मार्गदर्शनात २१ जून रोजी आधारकार्ड मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. यावेळी धानाचे बियाणे वितरित करण्यात आले.
ग्रामीण भागातील नागरिकांना आधार कार्ड काढण्यासाठी धानोरा येथे यावे लागते. त्यामुळे त्यांचे आर्थिक नुकसान होते व वेळेचा अपव्यय व मानसिक त्रास सहन करावा लागतो. त्यांची अडचण लक्षात घेऊन सावरगाव येथे आधार कार्ड मेळावा घेण्यात आला. याला नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. यावेळी २३ नागरिकांचे आधारकार्ड काढून देण्यात आले व वेळ झाल्याने ८१ नागरिकांची कागदपत्रे जमा करण्यात आली आहेत. तसेच ६४ नागरिकांना सात-बारा नमुना आठ, ४२ नागरिकांना रहिवासी प्रमाणपत्र,४ नागरिकांना बँक पासबुक,३ नागरिकांना रेशन कार्ड,२ जात प्रमाणपत्र काढून देण्यात आले. तसेच गरजू शेतकऱ्यांना धान्य बिजाई वाटप करण्यात आले. यावेळी पोलीस उपनिरीक्षक रमेश पाटील, शामराव गोरड यांनी पोलीस दाडलोरा खिडकीचे महत्त्व नागरिकांना पटवून दिले व लाभ घेण्याचे आवाहन केले. यावेळी पोलीस कर्मचारी व बहुसंख्य नागरिक उपस्थित होते.