कौसर खान
सिरोंचा (गडचिरोली) : जिद्दीला कठोर परिश्रमाची जोड दिल्यावर प्रतिकूल परिस्थितीवर मात करत यश साध्य करता येते. अतिदुर्गम सिरोंचातील आलेख मारगोनी या तरुणाने हे कृतीतून दाखवले आहे. वडिलांनी टीव्ही दुरुस्ती करून मुलाला शिकवले, त्याने देखील कठोर मेहनत घेऊन वडिलांचे स्वप्न पूर्ण केले. पायलट होऊन आई-वडिलांना त्याने हवाई सफर घडवून पांग फेडले.
येथील दामोदर सत्यनारायण मारगोनी हे सामान्य इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक. सिरोंचा हा अतिदुर्गम तालुका. त्यामुळे टीव्ही, फ्रीज ही साधनेही काही वर्षांपूर्वी अपुरीच होती. दामोदर मारगोनी हे आठवडी बाजारात टीव्ही, फ्रीज, कूलर दुरुस्तीची कामे करत असे. त्यांना आलेख व अविनाश ही दोन मुले. परिस्थिती बिकट होती; पण शिक्षणाचे महत्त्व ते जाणून होते. त्यामुळे दामोदर यांनी मुलांच्या शिक्षणात पैसे कमी पडू दिले नाही.
दुसरीकडे इलेक्ट्रॉनिक मेकॅनिकचे काम करतानाच दामोदर मारगोनी यांनी गावात टीव्ही, फ्रीजचे छोटेसे दुकान सुरू केले. व्यवसायात त्यांनी भरारी घेतली अन् मुलांनी शिक्षणात. धाकटा मुलगा अविनाश अभियंता झाला. तो दिल्लीच्या गुडगावात कार्यरत आहे, तर मोठा मुलगा आलेख हा पायलट बनला. पायलट झालेला तो तालुक्यातील पहिलाच तरुण आहे.
दरम्यान, पायलट झाल्यानंतर त्याने आई-वडिलांना तेलंगणातील हैद्राबाद येथील बेगमपेठा विमानतळावर बोलावले व तेथून संपूर्ण शहराची हवाई सफर घडविली. त्यामुळे आलेखसह त्याच्या आई-वडिलांचे कौतुक होत आहे.
तेलंगणा येथे घेतले शिक्षण
आलेख मारगाेनी याने बारावीनंतर तेलंगणात पदवी शिक्षण घेतले. तेथेच त्याच्या पायलट हाेण्याच्या स्वप्नाला आकार मिळाला. २०१९ मध्ये एका खासगी कंपनीसाठी पायलट म्हणून काम करणाऱ्या आलेखची आता एअर इंडियामध्ये निवड झाली असून ताे लवकरच रूजू हाेणार आहे.
शिक्षण सुरू असताना आई-वडिलांनी पूर्ण सहकार्य केले. अडचणी अनेक होत्या. पण शिक्षणासाठी पैसे नाहीत, असे कधी जाणवू दिले नाही. आई-वडिलांची खंबीर साथ व गुरुजनांचे मार्गदर्शन यामुळेच मी पायलट होऊ शकलो.
- आलेख मारगोनी, पायलट