गडचिराेली : पावसाळ्याच्या दिवसात गडचिराेली शहरासह अनेक ठिकाणच्या बाजारात रानभाज्या येतात. याच काळात शेतशिवारात आणि कुपकाटीत काटवल अर्थात, करटाेली ही वेलवर्गीय फळभाजी आढळून येते. या भाजीला गडचिराेली शहरात सध्या चांगलीच मागणी आहे. त्यामुळे काटवलांनी भावाचा विक्रमी पल्ला गाठला आहे. सद्यस्थितीत काटवल ७० रुपये पाव, म्हणजे २८० रुपये किलाे अशा दराने विकले जात आहे.
पावसाळ्यात सर्वाधिक महाग मिळणारी भाजी म्हणजे मशरूम अर्थात आळंबी. सध्या काटवलांनी एवढा भाव खाल्ला आहे की, मशरूमही त्यांच्यासमोर स्वस्त वाटत आहे.
काटवलाची भाजी चविला थोडी कडवट असली, तरी चविष्ट आहे. चवीला हटके आणि आराेग्यदायी असलेल्या काटवल व कारल्याला नागरिकांकडून माेठी पसंती आहे. काटवल हे हिरव्या रंगाचे आणि छोट्या वांग्यापेक्षा लहान आकाराचे हे फळ आहे. गडचिराेलीच्या बाजारात तालुक्यातील येवली, शिवणी, तसेच अमिर्झा भागातून अनेक शेतकरी काटवल विक्रीसाठी आणत आहेत. इंदिरा गांधी चाैकाच्या परिसरात विक्रेते काटवल विकताना दिसतात.
बाॅक्स...
काटवलातील पोषक गुणधर्म
काटवलामध्ये प्राेटीन, आयर्न मुबलक असतात, तसेच कॅलरीज अत्यल्प असतात. १०० ग्रॅम काटवलामध्ये १७ कॅलरीज आढळतात. याशिवाय फायबर व ॲन्टीऑक्सिडंट मुबलक प्रमाणात असतात. त्यामुळे ही भाजी पचायला हलकी असते. पावसाळ्याच्या दिवसात इन्फेक्शनचा धाेका, बद्धकाेष्टता व पाेटाजवळील चरबी कमी करण्यासाठी काटवलाच्या भाजीचे सेवन करणे अतिशय फायदेशीर ठरते. यात शरीरामधील नको असलेले घातक घटक बाहेर टाकण्यासाठी मदत हाेते, शिवाय कॅन्सर व हृदयविकाराचा धाेका कमी करण्यास मदत हाेते. मधुमेह रुग्णांसाठीही काटवलाचे सेवन फायदेशीर आहे. रक्तातील साखर, यामुळे नियंत्रणात ठेवण्यास मदत हाेते.