लोकमत न्यूज नेटवर्कघोट : मक्केपल्ली माल ग्रा.पं.चा प्रभार घेतल्यापासून येथील ग्रामसेवक कार्यालयात नियमित हजर राहत नाही. त्यांच्या कार्यप्रणालीमुळे नागरिकांची कामे खोळंबली आहेत. त्यामुळे त्यांची त्वरित बदली करावी, अन्यथा ग्रामपंचायतीला कुलूप ठोकण्यात येईल, असा इशारा सरपंच, उपसरपंचासह पदाधिकाऱ्यांनी दिला.गटविकास अधिकाऱ्यांना यासंदर्भात निवेदन आले. निवेदनात म्हटले आहे की, मक्केपल्ली माल येथील प्रशासकीय कामकाज सुरळीत चालावे, यासाठी पुढील आदेशापर्यंत तात्पुरत्या स्वरूपात आरती मानकर यांना प्रभार देण्यात आला. प्रभार सोपविल्यापासून ग्रामसेवक महिन्यातून एकदाच ग्रा.पं.ला येतात. ३० डिसेंबरला कार्यालयात मासिक सभा ठेवण्यात आली होती. परंतु सभेला ग्रामसेवक उपस्थित राहिले नाही. अनधिकृतपणे ते गैरहजर राहतात. त्यामुळे नागरिकांची अनेक कामे अडत आहेत. ग्रामसेवकांना अनेकदा नागरिकांकडून विचारणा झाल्यानंतर ते, तुम्हाला काय करायचे आहे ते करा, माझी तक्रार करायची असेल तर बीडीओ व सीईओकडे करा, असे ठणकावून सांगतात. त्यामुळे ग्रामसेवक मानकर यांची बदली करून ए.डब्ल्यू.जुवारे यांच्याकडे प्रभार सोपवावा, अशी मागणी पदाधिकाºयांनी केली. अन्यथा ग्रा.पं.ला कुलूप ठोकू, असा इशाराही सरपंच मुक्ता कांदो, उपसरपंच डी.डी.कांदो, ग्रा.पं.सदस्य जितेंद्र कांदो, सुलभा कांदो, नागरिक दीपक पिपरे, वासुदेव भोवरे यांनी दिला.
ग्रामसेवक गैरहजर; ग्रामपंचायतीला कुलूप ठोकण्याचा इशारा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 26, 2020 6:00 AM