चामोर्शी (गडचिरोली) : तालुक्यातील विक्रमपूर येथील सरपंच श्रीकांत सत्यनारायण ओलालवार (46 वर्ष), राहणार आंबेडकर वार्ड, चामोर्शी यांना एका लाभार्थीला घरकुलाचा लाभ मिळवून देण्यासाठी ९ हजार रुपयांची लाच घेतल्याच्या आरोपात ताब्यात घेण्यात आले. ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) पथकाने शुक्रवारी केली.
तालुक्यातील विक्रमपूर येथे सरपंच असलेले ओलालवार यांनी नवग्राम येथील तक्रारदाराला घरकुल योजनेत नाव नोंदवून घरकुलाचा लाभ मिळवून देण्याकरिता १० हजार रुपयांची मागणी केली होती. यानंतर तक्रारदाराने एसीबीकडे तक्रार केली. तडजोडीअंती सरपंच ९ हजार रुपये घेण्यास तयार झाला. ती रक्कम स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने सरपंचाला रंगेहाथ पकडून ताब्यात घेतले.
ही कारवाई एसीबीचे पोलीस अधीक्षक राकेश ओला, अपर अधीक्षक मधुकर गीते यांच्या मार्गदर्शनात गडचिरोली एसीबी पथकाचे उपअधीक्षक सुरेंद्र गरड, पोलीस निरीक्षक शिवाजी राठोड, पोलीस निरीक्षक श्रीधर भोसले, पोलीस हवालदार दत्तू धोटे, नायक पोलीस शिपाई राजेश पतंग गिरवा, श्रीनिवास संगोजी, किशोर ठाकूर, शिपाई संदीप उडाल, जोत्सना वसाके, चालक पो.हवालदार तुळशीराम नवघरे यांनी केली.