लाेकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : नागपूर विभागीय आयुक्त प्राजक्ता लवांगरे यांनी कोविडबाबत आढावा घेताना जिल्ह्यात लसीकरण वाढविण्याबरोबरच आरटीपीसीआर कोरोना चाचण्या वाढविण्याचे निर्देश जिल्हा प्रशासनाला दिले. कोविडच्या संभाव्य लाटेला रोखण्यासाठी आखण्यात आलेल्या उपाययोजनांचा त्यांनी आढावा घेतला. यावेळी त्या म्हणाल्या की, गडचिरोली जिल्ह्यात इतर जिल्ह्यांच्या तुलनेत उशिरा कोविड संक्रमण वाढत आहे. त्यामुळे लोक संसर्गाबाबत अनभिज्ञ राहण्याची शक्यता नाकारता येत नाही. लसीचा पहिला डोस उर्वरित नागरिकांना देण्याबरोबर पात्र लोकांना दुसरा डोसही द्यावा. कोरोनाची चाचणी करताना आरटीपीसीआरची टक्केवारी वाढवावी. संसर्ग झालेल्यांची खात्री योग्य प्रकारे होईल व त्यांच्या संपर्कातील इतरांचाही शोध नेमक्या स्वरुपात घेता येईल.त्याचबरोबर बेड्सची उपलब्धता, व्हेंटीलेटर, ऑक्सिजन प्लांट सद्यस्थितीत सुरु असल्याची खात्री करून त्यासाठी आवश्यक मनुष्यबळ तातडीने उपलब्ध होईल, याची दक्षता घेण्याची सूचना विभागीय आयुक्तांनी केली. ऑक्सिजन प्लांट यापुढे अखंड सुरु राहण्यासाठी मनुष्यबळ निर्मितीबरोबर कुशल मनुष्यबळ उपलब्ध व्हावे, याकरिता जिल्हा औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमधून तरुणांची निवड करता येईल, यासाठी नियोजन करावे, अशा सूचनाही दिल्या. या बैठकीला जिल्हाधिकारी संजय मीना, मुख्य कार्यकारी अधिकारी कुमार आशीर्वाद, प्रकल्प अधिकारी आशिष येरेकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डाॅ. संजय जठार व आरोग्य विभागातील इतर अधिकारी हजर होते.
स्वीप कार्यक्रमाची गती वाढवा- मतदार जनजागृतीकरिता राबविण्यात येत असलेल्या स्वीप कार्यक्रमांची गती वाढविण्याच्या सूचना विभागीय आयुक्त प्राजक्ता लवांगरे - वर्मा यांनी बैठकीत दिल्या. नवमतदार नोंदणी मतदान ओळखपत्र दुरुस्ती प्रक्रिया, मतदानाचे महत्व अशा बाबी राबविण्यासाठी वेगवेगळे उपक्रम हाती घेण्यात यावेत. तसेच दुर्गम भागातही स्थानिक प्रशासनाला स्वीप बाबत कार्यक्रम घेण्याचे निर्देश द्यावेत असे लवांगरे यावेळी म्हणाल्या.
लसीकरणाबाबत असलेले गैरसमज दूर करा- एटापल्ली, भामरागड, सिरोंचा, मुलचेरा व अहेरी भागात लसीकरणाचे प्रमाण कमी आहे. त्या ठिकाणी लसीकरणाचे प्रमाण इतर तालुक्यांच्या तुलनेत फारच कमी आहे. या ठिकाणी वेगळ्या प्रकारच्या मोहिमा राबवून त्यांना लसीकरणाचे महत्व पटवून जनजागृती करावी, अशा सूचना प्राजक्ता लवांगरे यांनी बैठकीत दिल्या. गावस्तरावरील आशा, अंगणवाडी सेविका, शिक्षक, तलाठी तसेच ग्रामसेवकाची मदत घेतली जात असल्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुमार आशीर्वाद यांनी सांगितले.
३०० चमूंची विशेष लसीकरण माेहीम - पुढील आठवड्यापासून ३०० चमूंची विशेष लसीकरणाची मोहीम सुरु करणार असल्याचे जिल्हाधिकारी यांनी सांगितले. तसेच आता घरोघरी लसीकरण करुन गडचिरोली जिल्ह्यात १०० टक्के उद्दिष्ट पूर्ण करणार असल्याची ग्वाही त्यांनी यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी दिली.
प्रलंबित दावे व हरकती तातडीने निकाली काढा
मतदार यादी ५ जानेवारी २०२२ रोजी अंतिम स्वरुपात प्रसिद्ध करण्याच्या सूचना निवडणूक आयोगाकडून आलेल्या असल्यामुळे त्यामधील प्रलंबित दावे व हरकती तातडीने निकाली काढाव्यात, अशा सूचना विभागीय आयुक्त प्राजक्ता लवांगरे-वर्मा यांनी दिल्या. जिल्ह्यात विधानसभा मतदार संघातून ९३५ मतदान केंद्र आहेत. यात एकूण मतदार ७९०५०२ मतदार असून महिला ३९०३८६ , पुरुष ४००११३ तर तृतीयपंथी ३ नव्याने मतदार नोंदणीसाठी व दुरुस्तीसाठी १८०९५ अर्ज दाखल झाले आहेत. त्याकरिता २१ बीएलओची नियुक्ती करुन १६७२५ अर्ज स्वीकारले त्यातील १३२३ नाकारलेले आहेत. ४१ अर्जावरील तपासणी शिल्लक आहे. मतदार यादी शंभर टक्के योग्य होण्यासाठी सर्व दावे हरकती वेळेत सोडवून मतदारांना त्याची माहिती मिळणे आवश्यक आहे.