धानोरा (गडचिरोली) : छत्तीसगडमधून परतणारी गडचिरोली आगाराची एसटी बस आणि मिनीडोअर या मालवाहू वाहनाची समोरासमोर धडक होऊन आठ प्रवासी जखमी झाले. हा अपघात शनिवारी सकाळी 10 वाजताच्या सुमारास कुलभट्टी गावाजवळील वळणावर झाला.प्राप्त माहितीनुसार, गडचिरोली आगाराची एमएच 40, एन 9513 क्रमांकाची बस मानपूर (छत्तीसगड) येथून गडचिरोलीकडे येत होती.
यावेळी धानोरा तालुक्यातील मुरूमगाव वरून धान घेऊन छत्तीसगडकडे जात असलेल्या सीजी 08, डब्ल्यू 0275 क्रमांकाच्या मिनीडोअरसोबत बसची मुरूमगाव-सावरगाव मार्गावर समोरासमोर धडक झाली. यात एसटी चालक माणिक नागापुरे, मिनीडोअरमधील विनोद सोनी रा.मुरूमगाव, आनंदराव मंडल रा.पाखांजूर, सपन बाला रा.कागजनगर, यशवंत सावरकर रा.मानपूर, इंदू पोटावी रा.सीतागाव, माणिक पोटावी (अडीच वर्ष), सरीता तुलावी आणि तिचे 3 महिन्याचे बाळ रा.मरकागाव हे जखमी झाले.
जखमींवर मुरूमगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार केल्यानंतर धानोरा ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आले. पैकी गंभीर जखमी असलेल्या तिघांना गडचिरोली येथे पाठविण्यात आले. सर्वच जखमींना डोके, हात व पायाला मार लागला आहे.