गडचिरोली : शहरातील इंदिरा गांधी चौकात अगदी रस्त्यावर दुचाकी व चारचाकी वाहने पार्क केली जातात. सदर वाहनांवर कारवाई होत नसल्याने, वाहने रस्त्यावर लावण्याचे प्रमाण वाढत चालले आहे. वाहनांवर कारवाई करण्याची मागणी होत आहे.
खताच्या ढिगाऱ्यांमुळे डासांचे प्रमाण वाढले
गडचिरोली : तालुक्याच्या अनेक गावांमध्ये रस्त्याच्या कडेला शेणखताचे ढिगारे आहेत. सदर ढिगाऱ्यांमुळे वादळवारा आल्यास तो रस्त्यावर येतो व तेथील काडीकचरा पादचारी, तसेच वाहनधारकांच्या डोळ्यात जातो. यामुळे डासांचे प्रमाणही वाढले आहे. परिणामी, आरोग्य धोक्यात आले आहे.
खरपुंडी मार्गावर पथदिवे लावण्याची मागणी
गडचिरोली : खरपुंडी मार्गावर डम्पिंग यार्डपर्यंत वीज तारा टाकून खांब गाडण्यात आले आहेत. मात्र, या मार्गावर अजूनपर्यंत पथदिवे लावण्यात आले नाही. सकाळी अनेक नागरिक फिरण्यासाठी खरपुंडी मार्गावर जातात. या मार्गावर पथदिवे लावण्याची मागणी आहे.
हेमाडपंथी शिव मंदिर जीर्णावस्थेत
गडचिरोली : तालुक्यातील मरेगाव येथे शिव मंदिर आहे. सदर मंदिर हेमाडपंथी आहे. अमिर्झापासून चार किमी अंतरावर असलेल्या या मंदिराकडे पुरातत्त्व विभागाचे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे सदर मंदिर जीर्णावस्थेत पोहोचले आहे. सदर मंदिर पांडवांनी अज्ञातवासात असताना बांधले होते. या मंदिरातून भुयार जात असून, तो भुयार वैरागड येथील किल्ल्यामध्ये निघतो.
विमा नसलेली वाहने धावतात रस्त्यावर
आष्टी : कोणतेही वाहन खरेदी केल्यानंतर त्या वाहनाचा विमा काढणे बंधनकारक आहे. वाहनाचा विमा असल्यास अपघातानंतर आर्थिक मदत मिळण्यास वाव असतो. मात्र, वाहतुकीचे सर्व नियम धाब्यावर बसवून वाहन खरेदी सुरू असल्याने रस्त्यावर लाखो वाहने विम्याशिवाय धावत आहेत. त्यांच्यावर कारवाईची मागणी नागरिकांकडून होत आहे.
पोर्ला बस स्थानकावर गतिरोधकाची मागणी
गडचिरोली : तालुक्यातील, तसेच गडचिरोली-आरमोरी मार्गावरील प्रमुख ठिकाण म्हणून पोर्ला गावाची ओळख आहे. येथे नेहमीच बस स्थानकावर नेहमीच प्रवाशांची गर्दी असते. येथून वाहनधारक भरधाव वेगात वाहने हाकत असतात. त्यामुळे येथे गतिरोधक उभारावे.
कोरची तालुक्यातील अनेक शाळा विजेविना
कोरची : शासनाच्या आग्रहानंतर शाळांनी डिजिटल साधने खरेदी केले आहेत. मात्र, शाळेमध्ये वीजपुरवठा नसल्याने सदर साहित्य धूळखात पडून आहेत. काही शाळांना वीजपुरवठा होता. मात्र, वीजबिल भरला नसल्याने वीजपुरवठा खंडित करण्यात आला. त्यामुळे आता संबंधित शाळा विजेविनाच सुरू आहेत. डिजिटल साधनांचा पुरेपूर वापर करण्यासाठी शाळांमध्ये वीजपुरवठा आवश्यक झाला आहे.
प्लास्टीकमुळे जनावरांचे आरोग्य धोक्यात
गडचिरोली : शहरात अनेक मोकाट जनावरे फिरत असतात. पोटाची खळगी भरण्यासाठी परिसरात फेकलेला केरकचरा, प्लास्टीक जनावरे खात असल्याने जनावरांचे आरोग्य धोक्यात आले आहे. अनेकदा जनावरांचा मृत्यू झाल्याच्या घटनाही घडल्या आहेत.
पर्यटनस्थळाच्या विकासाकडे दुर्लक्ष
सिरोंचा : तालुक्यातील सोमनूर संगमाच्या विकासाकडे जिल्हा प्रशासनाने दुर्लक्ष होत आहे. सोमनूर घाटावर गोदावरी, प्राणहिता व इंद्रावती या तीन नद्यांचा संगम आहे. महाशिवरात्रीनिमित्त या ठिकाणी जत्रा भरत असून, हजारो भाविक उपस्थित राहतात. सोमनूरचा विकास करणे गरजेचे झाले आहे. त्यामुळे लक्ष देण्याची मागणी हाेत आहे.
बायोमेट्रिक प्रणालीचा उडताेय फज्जा
भामरागड : शासनाने कर्मचाऱ्यांच्या नियमित हजेरीकरिता अनेक कार्यालयात बायोमेट्रिक मशीन बसविलेल्या आहे. भामरागडातील आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय सोडले, तर बऱ्याच कार्यालयात ही बायोमेट्रिक मशीन बंद पडलेली आहे.
पन्न्या टाकणाऱ्यांवर कारवाई नाही
देसाईगंज : नगरपालिकेच्या क्षेत्रात व्यावसायिक व नागरिक मोठ्या प्रमाणावर काळ्या व पांढऱ्या प्लास्टीक पन्न्यांचा वापर करतात. अनेक जण दुकान बंद झाल्यानंतर या पन्न्या व प्लास्टीक कागद रस्त्यावर व नाल्यांमध्ये फेकतात.
आरोग्य केंद्रात राहणे सक्तीचे करा
देसाईगंज : प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचाऱ्यांना मुख्यालयी राहण्यासाठी रुग्णालयाच्या परिसरात निवासस्थाने बांधून देण्यात आली आहेत. मात्र, बहुतांश डॉक्टर व परिचारिका निवासस्थानांमध्ये राहत नाही. त्यांना राहणे सक्तीचे करावे, अशी मागणी होत आहे.
अनेक पांदण रस्त्यांवर अतिक्रमणाचा विळखा
जोगीसाखरा : शेतीकडे जाणाऱ्या मार्गाला ग्रामीण भागात सगर असे संबोधले जाते. रोजगार हमी योजनेंतर्गत याच रस्त्यांना पांदण रस्ता म्हटले जाते. जोगीसाखरा परिसरातील पळसगाव, रामपूर, कासवी आदी गावांतील शेतींकडे जाणाऱ्या अनेक पांदण रस्त्यांवर शेतकऱ्यांनी अतिक्रमण केले आहे.
कोडसेपल्लीत समस्या सोडविण्याची मागणी
अहेरी : परिसरातील दुर्गम भागात वसलेल्या कोडसेपल्ली येथे अनेक समस्यांची भरमार आहे. गावात नाल्यांचा अभाव असल्याने पाण्याचा निचरा होण्यास अडचण जात आहे. परिणामी, जागोजागी सांडपाणी साचून दुर्गंधी पसरली आहे.
चपराळा पर्यटनस्थळाच्या सुविधांकडे लक्ष द्या
आष्टी : चामोर्शी तालुक्यातील श्रीक्षेत्र प्रशांतधाम चपराळा येथे दरवर्षी महाशिवरात्रीला यात्रा भरते. मात्र, या ठिकाणी सोईसुविधांचा अभाव असल्याने भाविकांना त्रास सहन करावा लागत आहे. प्रशासनाने याकडे लक्ष देऊन या स्थळाचा विकास करावा.
मामा तलावांमधील अतिक्रमण कायमच
आरमोरी : अनेक मामा तलावांमध्ये सभोवतालच्या शेतकऱ्यांनी अतिक्रमण करून, त्यामध्ये धानाच्या बांध्या निर्माण केल्या आहेत. त्यामुळे जलपातळीत घट झाली आहे. सदर अतिक्रमण हटविण्याकडे सिंचन विभागाचे दुर्लक्ष होत आहे. गडचिरोली शहरातील गोकुलनगर लगतच्या तलावात अतिक्रमणधारकांनी पक्के घरे बांधली आहेत.
कव्हरेज नसल्याने नागरिक त्रस्त
अहेरी : आलापल्ली-सिरोंचा मुख्य मार्गावरील गोलाकर्जी गावात कव्हरेज नसल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. गोलाकर्जी रस्त्यावर असल्याने राजाराम, खांदला, पत्तीगाव, चिरेपल्ली, छल्लेवाडा, मरनेली आदी गावांचा संपर्क आहे.
भाकरोंडी परिसरातील रस्त्यांची दुरवस्था
भाकरोंडी : परिसरातील अनेक गावांतील रस्त्यांचे २० वर्षांपूर्वी बांधकाम करून डांबरीकरण करण्यात आले, परंतु सदर मार्गाची अद्यापही दुरूस्ती करण्यात आली नाही. त्यामुळे या परिसरातील नागरिकांना आवागमन करताना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. आता डांबरीकरण पूर्णता उखडले आहे.
शेतकरी विविध योजनांबद्दल अनभिज्ञ
भामरागड : कृषी, महसूल व वन विभागाच्या वतीने शेतकऱ्यांसाठी विविध योजना कार्यान्वित करण्यात आल्या आहेत. अधिकारी व कर्मचारी दुर्गम व नक्षलग्रस्त भागातील गावांमध्ये पोहोचत नसल्याने शेतकऱ्यांना माहिती मिळत नाही.