लाेकमत न्यूज नेटवर्कदेसाईगंज : येथील वैनगंगा नदीवर दुचाकी ते अवजड वाहनांसाठी बांधण्यात आलेल्या पुलावर दोन स्लॅबच्या दरम्यान मोठ्या स्वरूपात गडप तयार होऊन मोठ्या खाचा निर्माण झाल्या आहेत. उंचवटे व खाच तयार झाल्याने वाहनांना जबरदस्त झटका बसून वाहनांची मोठ्या प्रमाणात हानी होऊन अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. वैनगंगा नदीवर बांधण्यात आलेल्या पुलाचा निर्माणाधीन कालावधी हा सन १९९०-१९९५ दरम्यानचा आहे. गडचिरोली व चंद्रपूर या दोन जिल्ह्यांना जोडणारा महत्त्वाचा दुवा आहे. या पुलावरून दुचाकीसह अवजड वाहनांची वाहतूक मोठ्या प्रमाणात सुरू असते. या पुलावर दोन स्लॅब ज्या ठिकाणी आलेले आहेत असे एकंदरीत अठ्ठावीस भेगा पडल्या आहेत. पुलाच्या निर्माणाधीन कालावधीत या भेगा लहान स्वरूपाच्या होत्या; पण आता या दोन स्लॅबच्या गॅपमधील रुंदी वाढली आहे. त्यामुळे ब्रेकरपेक्षाही मोठे झटके वाहनांना बसू लागले आहेत. या गॅपमध्ये वाहनाचा तोल जाऊन पडण्याचे प्रमाणही वाढले होते. सार्वजनिक बांधकाम विभागाने त्या ठिकाणी गॅप बुजविण्यासाठी डांबर टाकले होते. काही दिवसांनी तेच डांबर वाहनाच्या वर्दळीने वर येऊन त्यांचे उंच कडा व गॅप तयार झाल्याने या पुलावर २८ ठिकाणी भेगा पडल्या आहेत. पुलावर तयार झालेल्या खाचा व उंचवटे अपघातास निमंत्रण देत असून, वाहनांचीही मोठ्या प्रमाणात हानी होत आहे. संबंधित बांधकाम विभागाने या गंभीर बाबीकडे लक्ष देण्याची गरज आहे. पुलावर पडलेला मोठा गॅप त्वरित बुजविण्यात यावा, अशी मागणी होत आहे. याबाबतीत सार्वजनिक बांधकाम विभागाच्या शाखा अभियंत्यांशी संपर्क साधला असता त्यांच्याकडून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही.
ग्रामीण भागातील अनेक रस्ते उखडलेदेसाईगंज तालुक्याच्या विसाेरा, कुरूड, काेंढाळा गावातील अंतर्गत रस्ते उखडले आहेत. ग्राम पंचायत प्रशासनाच्या वतीने दरवर्षी रस्ते व नाल्या बांधकामांवर लाखाे रूपयांचा खर्च केला जाताे. मात्र काम याेग्य हाेत नसल्याने अल्पावधीतच पुन्हा जैसे थे हाेतात. रस्ते कामाबाबत अनेक तक्रारी येऊनही दर्जा सुधारताना दिसून येत नाही.