गडचिरोली : गडचिरोली-चिमूर लोकसभा क्षेत्राचे भाजपचे खासदार अशोक नेते यांच्या वाहनाला ४ नोव्हेंबर रोजी नागपूर-गडचिरोली महामार्गावर भरधाव टिप्परने धडक दिली. वेळीच ‘एअरबॅग’ उघडल्याने ते थोडक्यात बचावले. मात्र, अपघाताची घटना व त्यानंतर तेथील संशयास्पद हालचाली यावरून त्यांनी या घटनेची कसून चौकशी करावी, अशी मागणी केली आहे. त्यामुळे हा अपघातच की घातपाताचा डाव, या चर्चेला उधाण आले आहे.
खासदार अशोक नेते हे ३ नोव्हेंबरला मध्यरात्री मुंबईहून नागपूरला पोहोचले. नागपूर येथील शासकीय विश्रामगृहात मुक्काम करून ४ नोव्हेंबरला सकाळी साडेनऊ वाजता ते गडचिरोलीला जाण्यासाठी चारचाकी वाहनाने (एमएच ३३ एए- ९९९०) निघाले होते. विहीरगावजवळ त्यांच्या वाहनासमोर आडव्या रस्त्याने अचानक टिप्पर आले व समोरासमोर जोरदार धडक झाली. यावेळी खासदार नेते यांच्यासह चालक, दोन सुरक्षारक्षक व अन्य एक असे पाच जण वाहनात होते.
नेते हे समोरील सीटवर होते. टिप्परची धडक एवढी जबर होती की, खासदार नेतेंसह चालकाचीही एअरबॅग उघडली, त्यामुळे त्या दोघांसह आतील इतर तीन प्रवासी सुदैवाने सुखरूप बचावले. मात्र, अपघातावेळी घडलेला प्रसंग शंका उपस्थित करणारा आहे. नेतेंचे वाहन महामार्गावरून जात असताना धडक दिलेला टिप्पर डाव्या बाजूला उभा होता. नेतेंचे वाहन जवळ येताच टिप्पर चालकाने महामार्गावर गाडी आडवी केली. यामुळे नेतेंच्या गाडीची टिप्परला थेट धडक बसली. या अपघातानंतर खासदार नेते यांनी पोलिसांना हा घातपाताचा तर डाव नव्हता, या दृष्टीनेही तपास करण्याचे निर्देश दिले आहेत. नागपुरातील हुडकेश्वर पोलिस या घटनेचा तपास करत आहेत.
अपघातावेळी डाव्या बाजूला उभे असलेले टिप्पर अचानक आडवे आले. या टिप्परच्या हालचालींबाबत शंका आहे. त्यामुळे पोलिसांना त्यादृष्टीनेही तपास करावा अशा सूचना दिल्या आहेत. तपासानंतर सर्व त्या बाबी समोर येतीलच.
- अशोक नेते, खासदार