आमगाव महाल येथील पुंडलिक पोचू वाळके यांच्या शेत जमीन सर्व्हे नं. २५८ मध्ये रेतीचा अवैध साठा केलेला आहे. हा रेतीसाठा लिलाव प्रक्रियेकरिता जाहीरनामा प्रसिद्ध केला. १२ मे २०२१ राेजी अवैध रेतीसाठा ३०२ ब्रास साठवणूक करून लिलाव प्रक्रिया पार पाडण्यात आली. परंतु, प्रत्यक्षात सर्व्हे नं. २५८ मधील साठवणूक केलेली रेती ७० ब्रास आहे, परंतु लिलाव करण्यापूर्वी बांधकाम विभागाच्या अभियंत्यांमार्फत मोजणी करून ३०२ ब्रास रेतीसाठा निश्चित केलेला आहे. यावरून रेती माफियांना त्यांचे कसे सहकार्य आहे, हे स्पष्ट होते. त्यामुळे या जागेवर प्रत्यक्ष पाहणी करून अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष रेतीसाठ्याचे मोजमाप करावे व त्याविरुद्ध कारवाई करण्यात यावी, अशी मागणी ग्रामपंचायत सदस्य सुभाष कोठारे, लक्ष्मण वासेकर, भाऊराव देवतळे, प्रेमिला बैस यांनी पत्रकार परिषदेतून केली.
लिलावधारकाला जाहीरनामा अट क्रमांक ५ नुसार प्रत्यक्ष उपलब्ध असलेल्या व्यतिरिक्त इतर ठिकाणाहून रेती उचल करण्याचा अधिकार नाही. तरी या अटींचे उल्लंघन करण्यात आले. तसेच अवैध रेतीसाठ्याचा लिलाव झाला असताना त्याचा ताबा देण्याअगोदर त्यांनी दिवसाढवळ्या अवैध रेती उत्खनन सुरू केले. वरिष्ठ स्तरावरून त्या कंत्राटदारास किती पाठबळ आहे, हे लक्षात येते. कंत्राटदाराकडून रेती तस्करीचा गोरखधंदा जाेमात सुरू आहे. खोडदा ते आमगाव नदीपात्रातून हजारो ब्रास रेती उपसा करून त्या रेतीची चौकशी करण्यात यावी, तसेच महसूल प्रशासनाने दिलेल्या कंत्राटदाराला रेती साठा उचल करताना त्या ठिकाणी कर्मचाऱ्याची नियुक्ती करण्यात यावी व टीपी पास करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली. त्या कंत्राटदाराने खंडणी मागितल्याप्रकरणी चामोर्शी पोलीस स्टेशनमध्ये खोटी तक्रार दाखल केली असून, कंत्राटदाराकडून आमच्या जिवास धोका आहे. त्यामुळे या प्रकरणाचा वरिष्ठ स्तरावरून योग्य तपास व्हावा व आम्हाला न्याय द्यावा, अशी मागणी पत्रकार परिषदेत करण्यात आली. या मागणीचे निवेदन आमदार, जिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी व तहसीलदारांना देण्यात आले आहे, अशी माहिती पदाधिकाऱ्यांनी पत्रकार परिषदेत दिली.
बाॅक्स
रेती संचय केल्याची चित्रफीत असल्याचा दावा
अवैध रेती माफियांना प्रशासनाचे सहकार्य असल्यामुळे त्यांचे मनोधैर्य वाढवून लिलाव घेतलेल्या रेतीसाठ्यामध्ये वाढ करण्यासाठी कंत्राटदार संजय वडेट्टीवार यांनी काही ट्रॅक्टरमालकांना सोबत घेऊन नदीपात्रातून अवैधरीत्या रेती उत्खनन करून लिलाव झालेल्या रेतीसाठ्यात संचय केला आहे. ही माहिती गावकऱ्यांनी महसूल विभागाच्या कर्मचाऱ्यांना दिली असता कर्मचारी मोक्यावर येताच ट्रॅक्टरचालक तेथून पसार झाले. या प्रकरणाची चित्रफीत तयार केली आहे, असा दावा पदाधिकाऱ्यांनी केला; परंतु या ट्रॅक्टरचालकावर कोणतीही कारवाई करण्यात आली नाही. तरी त्या ट्रॅक्टरचालकावर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी पत्रकार परिषदेत केली.
काेट
रेतीसाठ्याची लिलाव प्रक्रिया जिल्हाधिकाऱ्यांच्या अहवालानुसार व काेणत्याही नियमांचे उल्लंघन न करता पार पाडण्यात आली. तसेच या लिलावाचा जाहीरनामा ग्रामपंचायत आमगाव, वालसरा येथे लावण्यात आला होता; परंतु कोणाचा आक्षेप न आल्याने लिलाव प्रक्रिया पार पाडण्यात आली. सार्वजनिक बांधकाम उपविभाग यांच्यामार्फत तांत्रिक मोजमाप अहवालानुसार ३०२ ब्रास रेतीसाठ्याचा लिलाव करण्यात आला. पत्रकार परिषदेत महसूल प्रशासनावर केलेले आरोप पूर्णत: खोटे आहेत.
उत्तम ताेडसाम, उपविभागीय अधिकारी चामाेर्शी.
काेट
महसूल प्रशासनाकडून रीतसर ३०२ ब्रास रेतीचे कंत्राट परवानगी घेऊन घेतले आहे. आपण रेतीची अजूनपर्यंत उचल केली नाही व ताबाही घेतलेला नाही. त्यामुळे अवैध रेती उपसा करीत असल्याचे आपल्यावर केलेले आरोप हे पूर्णपणे खोटे व बिनबुडाचे आहेत.
संजय वडेट्टीवार, रेती कंत्राटदार.
===Photopath===
200521\img_20210520_111102.jpg
===Caption===
प्रकार परिषद फोटो चामोर्शी