धुडगूस घातल्याचे प्रकरण : अॅट्रासिटी अंतर्गत गुन्हा दाखलएटापल्ली : स्थानिक पंचायत समितीच्या नरेगा विभागात सहायक कार्यक्रम अधिकारी म्हणून कंत्राटी पदावर कार्यरत असलेल्या शैला भिवगडे यांच्या शासकीय निवासस्थानी धुडघूस घातल्याप्रकरणी भिवगडे यांच्या तक्रारीवरून एटापल्ली पोलिसांनी विनोद चव्हाण याचेवर अॅट्रासिटी अंतर्गत गुन्हा दाखल करून बुधवारी अटक केली. १० मे रोजी आरोपी विनोद चव्हाण याने रात्रीच्या सुमारास कंत्राटी कर्मचारी शैला भिवगडे राहत असलेल्या शासकीय निवासस्थानातील क्रमांक २० च्या क्वॉटर्रच्या दरवाजापुढे येऊन दार उघडण्यासाठी भिवगडे यांच्यावर दबाव टाकला. त्यानंतर त्याने दार तोडून घरात धुडघुस घातला, अशी तक्रार शैला भिवगडे यांनी एटापल्ली पोलीस ठाण्यात केली. या तक्रारीवरून पोलिसांनी विनोद चव्हाण याचेवर भादंविचे कलम ४५२, ४५७ व ४२७ अन्वये गुन्हा दाखल केला. मात्र पोलिसांनी त्याला अटक केली नव्हती. त्यानंतर शैला भिवगडे यांनी चव्हाण विरोधात पोलिसांत दिलेली तक्रार मागे घेण्यास पोलिसांकडून आपल्यावर दबाव येत असल्याचा आरोप पालकमंत्री अम्ब्रीशराव आत्राम यांना दिलेल्या निवेदनातून केला. तसेच अॅक्ट्रासिटी कायद्याच्या कलमांतर्गत विनोद चव्हाण कठोर कारवाई करावी, अशी मागणी निवेदनातून भिवगडे यांनी पालकमंत्र्याकडे केली होती. त्यानंतर एटापल्लीचे पोलीस उपविभागीय अधिकारी नितीन जाधव यांनी या प्रकरणाचा तपास करून विनोद चव्हाण याच्या विरोधात अॅक्ट्रासिटी कायद्याचे कलम ३५४, ३, १, ११ अन्वये गुन्हा दाखल करून त्याला अटक केली. (तालुका प्रतिनिधी)
आरोपी विनोद चव्हाणला अटक
By admin | Published: May 19, 2016 1:11 AM